भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसाय उभारुन सक्षम व्हावे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसाय उभारुन सक्षम व्हावे - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे 

कोल्हापूर, भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी आपल्यातील कलागुण ओळखून त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेवून उद्योग व्यवसायातून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. 

  महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पाादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी बचत गटातील ज्येष्ठ महिला नवसाताई पाटील यांच्या हस्ते फीत कापून स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे डेएलएलएमचे कार्यक्रम अधिकारी रोहित सोनुले आदि उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील 70 हजारहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत. महिला आपले घर, संसार सांभाळून बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाकडे वळल्या आहेत. बचत गटांमुळे त्या स्वत:सह कुटूंबाची आर्थिक उन्नती साधत आहेत, ही कौतुकास्पद बाब आहे. यामुळेच त्यांच्या उद्यमशीलतेला चालना मिळत आहे. महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ घ्यावा, असे सांगून आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करुन जीवनात चांगला मार्ग दाखवण्याचे काम महिलाच करतात. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडवण्यात महिलांचा महत्वपूर्ण वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

  या ठिकाणी आयोजित प्रदर्शनामध्ये महिलांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्यात येणार असून याचा लाभ महिलांनी घेवून उद्योग निर्मिती करावी. तसेच बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्री प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिकांनी भेट द्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी केले.

  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई म्हणाल्या, सध्या मॉल आणि ऑनलाईन शॉपिंगद्वारे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यात टिकून राहण्यासाठी बचत गटांतील मालाचे दर्जेदार पध्दतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग होणे आवश्यक आहे. यादृष्टीने बचत गटातील वस्तूंना चांगला बाजारभाव मिळण्यासाठी विविध उद्योगधंद्यांसाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते प्रशिक्षण व भरघोस अनुदान देण्यात येत आहे. याचा लाभ अधिकाधिक महिलांनी घ्यावा. कोल्हापूरची चटणी, मसाले, लोणची पापडसह अन्न पदार्थ, मध, आवळा, जांभळे, करवंदाचा ज्यूस, कोल्हापूरी चप्पल निर्मिती आदी उद्योग व्यवसाय करुन महिलांनी उन्नती साधावी. 

  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे म्हणाले, कृषी विभागाच्या वतीने बचत गटांसाठी अनेक लाभ देण्यात येत असून शेतकरी गटांना भरघोस अनुदान दिले जाते. सेंद्रिय शेती उत्पादनाचे ब्रँडिंग, मार्केटिंग, रोपवाटिका निर्मिती अशा विविध उद्योगांना शासनाच्या वतीने आर्थिक लाभ दिला जातो. वैयक्तिक लाभाबरोबरच बचत गटातील महिलांनी अधिकाधिक संख्येने एकत्र येवून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा.

शुतोष जाधव यांनी विमा सुरक्षा, डिजिटल पेमेंट, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा विकास आदी बाबत मार्गदर्शन केले. प्रदर्शनातील स्टॉल मधील विविध उद्योगांची माहिती घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

  माविमचे सचिन कांबळे यांनी प्रास्ताविकातून नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाची माहिती दिली. तंत्रज्ञान अधिकारी उमेश लिंगनूरकर यांनी आभार मानले.

  दिनांक 19 मार्च 2023 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे प्रदर्शन व विक्री होत आहे. प्रदर्शनामध्ये माविम, नाबार्ड स्थापित, जिल्हा ग्रामीण यंत्रणा (DRDA), DAY -NULM कोल्हापूर महानगरपालिकेच्या बचत गटांचे स्टाँल लावण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्य महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणी युक्त पदार्थ,राजगिरा याचे स्वतंत्र स्टाँल लावण्यात आले आहेत. बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांच्या स्टॉलला पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.