शिवसेनेच्या शिबिरावर दबाव टाकण्यासाठी दर्ग्यावर बुलडोझर : संजय राऊत

शिवसेनेच्या शिबिरावर दबाव टाकण्यासाठी दर्ग्यावर बुलडोझर :  संजय राऊत

नाशिक: शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला. “शिवसेनेच्या शिबिरात अडथळे निर्माण करण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आजच्या दिवशीच दर्ग्यावर बुलडोझर चालवण्यात आला,” असा दावा त्यांनी केला. राऊत म्हणाले की, “भाजप अजूनही शिवसेनेला घाबरतो. त्यामुळे वातावरण बिघडवण्याचा डाव खेळला गेला.”

राऊत पुढे म्हणाले, दर्ग्यावर कारवाई करण्याचा उद्देश फक्त राजकीय आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे अनेक नेते या शिबिरात उपस्थित आहेत. म्हणूनच भाजपने प्रशासनावर दबाव आणून याच दिवशी कारवाई करायला लावली. जर हिंमत असेल, तर राजकीय लढाई मैदानात लढा. दर्गे तोडून गोंधळ निर्माण करणं हे कोणत्या मानसिकतेचं लक्षण आहे?, असा रोखठोक सवालही राऊतांनी उपस्थित केला.

... तर त्यांनी आपली चूक कबूल करावी 

दरम्यान, शिवसेनेच्या आरोपांवर भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, “ही कारवाई कोर्टाच्या आदेशावर आधारित होती, कोणताही मुहूर्त भाजपने ठरवलेला नाही.”

त्या म्हणाल्या, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना औरंग्याच्या कबरीचं तुष्टीकरण झालं होतं. आज जर राऊत आणि ठाकरे यांच्यात हिंदूंबद्दल अजूनही भावना उरल्या असतील, तर त्यांनी ही कारवाई योग्य ठरवावी आणि आपली चूक कबूल करावी.”