शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनादिवशी संजय राऊतांनी सोडले सरकारवर टीकास्त्र

मुंबई - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चा ५९ वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांनी सरकारवर घणाघाती टीका करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, आजचा कार्यक्रम केवळ विचारांचा आहे, मनोरंजनाचा नाही. "मनोरंजनाची जबाबदारी सरकारनेच घेतली आहे," असा टोलाही त्यांनी लगावला.
राऊत पुढे म्हणाले, "दररोज काहीतरी नवं नाटक सुरू असतं. आज सकाळी तर थेट हॉरर शोच झाला. एका मंत्र्याचा अघोरी बाबासोबतचा कार्यक्रम बघितला. टॉवेलवर बसलेला बाबा, हाती कवटी आणि खुर्चीखाली रेड्याचं शिंग... हे दृश्य म्हणजे अघोरी विद्येचं जिवंत प्रातिनिधिक चित्र वाटलं." या कार्यक्रमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार कोठेतरी डोममध्ये वेगळा कार्यक्रम साजरा करत आहेत, असा खोचक उपरोधही त्यांनी व्यक्त केला.
राऊत यांनी स्पष्ट केलं की, उद्धव ठाकरे यांनी ठरवलं आहे की मनोरंजन नव्हे, तर विचार मांडायचा कार्यक्रम द्यायचा. "शिवसेनेनं या ५९ वर्षांत महाराष्ट्र आणि देशाला नेहमीच विचार दिला आहे. आज इथे बसलेले शिवसैनिक आत्मविश्वास, जिद्द आणि निर्धार ठेवावा. कारण शिवसेना किसीसे कम नहीं!"
शिवसेनेच्या विरोधकांवर टीका करताना राऊत म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी जन्मलेल्यांना वाटतं ते ५९ वर्षांचे झाले. मुंबईत स्थापन दिन साजरा करणं हा मराठी माणसाचा अपमान आहे. तुमचा पक्ष स्थापन झाला सुरतमध्ये, मग तिथेच कार्यक्रम घ्या. अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावा, आम्हाला हरकत नाही. पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा अधिकार तुमच्याकडे नाही."
भाजपवर उपरोधिक टीका करत राऊत म्हणाले, "मी फडणवीसांना विनंती करतो की भाजपने पुढच्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप घ्यावी. कारण आज सगळीकडे शो सुरू आहेत."
शिवसेनेचे ५९ वर्षे पूर्ण होणं ही भारतीय राजकारणातील एक चमत्कार आहे, असं सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ देत म्हटलं, "देशात शेवटी दोनच सेना राहतील.एक भारतीय सेना आणि दुसरी शिवसेना. बाकी सगळ्या टोळ्या."
राऊत म्हणाले, "शिवसेना अजूनही विचाराने तरुण आहे. वाघ कधीही गवत खात नाही. स्वतःला वाघ समजणारे आता गवत खात आहेत, पण आम्ही नाही. शिवसेना ही मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करणारी पहिली ताकद होती, जेव्हा बाकी सगळे पक्ष अजून जन्मलेही नव्हते."
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शिवसेनेच्या संघर्षमय प्रवासाची आठवण करून दिली. "हा पक्ष कधीही भ्रष्टाचारावर किंवा ठेकेदारांच्या पैशांवर उभा राहिला नाही. शिवसैनिकांच्या घामावर, रक्तावर आणि निष्ठेवर हा पक्ष उभा आहे. कितीही घाव बसले तरी शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही," असा ठाम विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.