संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

मुंबई :राज्यात सत्ता स्थापण्यासाठी खलबते सुरु असतानाच मुख्यमंत्री सातारा जिल्यातील आपल्या मूळ गावी दरेला निघून गेले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठीकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक होणार होती. मात्र अचानकपणे शिंदे गावी गेल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. हीच संधी साधत  संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर  दिले  आहे. 

संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली त्यावर, शिरसाट म्हणाले की, ''मानसिक संतूलन कुणाचं बिघडलेलं आहे. हे निकालानंतर सगळ्यांना कळालेलं आहे. जे ओरडून सांगत होते की आमची सत्ता येणार... १६०-१७०...ते पूर्ण ६० सुद्धा गाठू शकले नाहीत. मानसिक संतूलन विरोधकांचं  बिघडलेलं आहे. त्यामुळे त्यांचे जे इतर नेते आहेत, ते यावर एक शब्द बोलत नाही, त्यांना त्यांची चूक कळालेली आहे. परंतू, ज्याला फक्त शेपूट हलवून आपल्या मालकाची चाकरी करायचं माहितीय...तेच लोकं अशी टीका करु शकतात''.

भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही माहिती नाही

'एकनाथ शिंदेंनी दिलेरपणाने आणि आत्मविश्वासाने सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोकं नाही. पोटात एक आणि ओठात एक आणणारी औलाद नाही. आमच्या चेहऱ्यावर जे तेच आमच्या मनात असतं. आमची नाराजी जरी असेल तरी आम्ही उघडपणे जाहीर करु. लाचारीमध्ये अडीच वर्ष पूर्वीची ज्यांनी घालवली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही. ते कुणाची प्रशंसा करतात तर कुणावर टीका करताय, त्या टीकेला देखील काही अर्थ नाही. टीकेशिवाय विरोधकांकडे दुसरा उद्योग नाही. शिंदेंनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या, मी शिवसेनेचा पक्षप्रमुख माझी त्याला संमती असेल. मी तुमच्यासोबत आहे, महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. भाजप अजून मुख्यमंत्री का ठरवत नाही माहिती नाही'', असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले.