संस्कार आणि संस्कृती रुजवण्यासाठी खेळघरचे कार्य उल्लेखनीय ..!

कोल्हापूर - खेळघर परिवार कोल्हापूर हा पालकमंच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रेरणेने, सहकार्याने व मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात कार्यरत आहे. खेळघरची स्थापना गुढीपाडवा 27 मार्च 2009 ला झाली. मुलांच्या अध्ययन क्षमता विकसित करणे आणि औपचारिक शिक्षणाला अनौपचारिक पद्धतींची जोड देणे ही खेळघर कार्यपद्धतीची उद्दिष्ट्ये आहेत.
आज हॉटेल आयोध्या या ठिकाणी खेळघर परिवाराचा सामुदायिक वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम. चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, खेळघरच्या जुई कुलकर्णी, सुमेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ना. चंद्रकांत दादा पाटील व अंजली पाटील यांनी लहान मुलांचे औक्षण करून आशीर्वाद दिले.
याप्रसंगी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी, सर्वप्रथम खेळघरच्या लहान मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. खेळघरच्या विद्यार्थ्यांची संख्या 2200 पर्यंत पोहचल्याचा आनंद व्यक्त करत याचे चांगले परिणाम विद्यार्थी आणि पालकांना जाणवत असल्याचे नमूद केले. वाढदिवस हे निमित्त असून आपण एक वर्षाने मोठे झालो याची समज सर्वांना आली पाहिजे. या समजदारीला संस्कार म्हणतात हे संस्कार आणि संस्कृती रुजवण्याचे कार्य खेळघर उत्तम प्रकारे करत असल्याचे नमूद केले. आपलेपणा जोपासण्याबरोबरच समाजामध्ये परोपकाराची म्हणजेच दुसऱ्यासाठी झिझण्याची भावना निर्माण झाली पाहिजे त्यातूनच समाज टिकून राष्ट्र बलशाली होईल असे प्रतिपादन याप्रसंगी नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.
याप्रसंगी बालचमू आणि शिक्षकांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जुईताई कुलकर्णी म्हणाल्या की, कोल्हापूर शहराच्या विविध भागात मिळून १०१ खेळघरे सध्या कार्यरत असून पहिली ते सातवी वयोगटातील सुमारे १७०० मुले याचा लाभ घेत आहेत. सोमवार ते शनिवार रोज दीड तास रोज दीड तास खेळघर भरते. दीड तासाच्या कालावधीत प्रार्थना, ध्येय गीत, खेळघर पद्धतीने कृतियुक्त अध्यापन, शालेय अभ्यासातील अडचणी सोडवायला मदत आणि छोटासा खेळ, गाणी, श्लोक इ . आलटून पालटून घेतले जातात. प्रार्थनेनंतरच्या १o मिनिटात घेतले जाणारे सुशोभन कोपरा / कुतुहल कोपरा / ओळखा मला / पाहुणा कोण ? यावरचे काम हे देखील खेळघराचे एक वैशिष्ट्य आहे. याखेरीज स्वच्छता प्रबोधन फेरी, दिनविशेष कार्यक्रम, मुलांसाठी, ताईं साठी क्रीडा स्पर्धा होतात. मुलांसाठी दादांच्या प्रेरणेने खेळ गाडी पण आहे जी दर शनिवारी ठरलेल्या भागात क्रीडा साहित्य देते आणि मुले मनसोक्त खेळतात.
दर आठवड्याला एकदा खाऊ सर्व मुलांना दिला जातो आणि यात मुगाचे / कणकेचे / नाचणीचे /राजगिऱ्याचे / शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू दिले जातात. याप्रसंगी बी.बी यादव, राहुल चिकोडे,किशोर देशपांडे यांची उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खेळघरच्या सुमेधा कुलकर्णी, कविता मोहिते, चित्रा कशाळकर, अपर्णा कुलकर्णी, सारिका रणदिवे संपदा कांबळे,अश्विनी शिरगावकर यांच्यासह खेळकरच्या सर्व ताई यांनी परिश्रम घेतले.