समरजीत घाटगे यांनी कागलमधील 'ती' जागा परत करावी अन्यथा संघर्ष उद्भवेल : मंत्री हसन मुश्रीफ

कागल : कागलचे जुने तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशनचा तुरुंग, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन दवाखाना, नगरपालिकेच्या मालकीची शाहू सांस्कृतिक हॉलची जागा समरजीत घाटगे यांनी गुपचूपपणे आपल्या कुटुंबीयांच्या नावावर लावून घेतली आहे. कागलच्या जनतेच्या मालकीची ही जागा स्वतःच्या नावावर लावून घेताना त्यांना लाज कशी वाटली नाही, असा सवाल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. ही जागा त्यांनी होती तशी परत हस्तांतरित करावी असा सबुरीचा सल्ला देताना मुश्रीफ म्हणाले, अन्यथा फार मोठा संघर्ष उद्भववेल. रस्त्यावरच्या लढ्यासह न्यायालयीन लढाही लढू.
कागलमध्ये एका जाहीर कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. त्यावेळी समरजीत घाटगे यांच्यावर त्यांनी ही तोफ डागली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
भाषणात मंत्री मुश्रीफ म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने त्यांना योग्य ती जागा दाखवलेली आहे. त्यांनी संपत्तीचा इतका हव्यास धरू नये. मी त्यांना समस्त कागलवासीयांच्यावतीने विनंती करतो की, त्यांनी हा आग्रह सोडावा. त्यांनी ही जागा तातडीने नगरपालिकेला होती तशी हस्तांतरीत करावी. जुने तहसीलदार कार्यालय असलेल्या जागेत नगरपालिकेच्यावतीने पार्किंगसह मॉल बांधावयाचा होता.
मतभेदापलीकडचे ऋणानुबंध.......!
भाषणातच मंत्री मुश्रीफ यांनी कागलचे अधिपती श्रीमंत बाळ महाराज यांच्या थोरल्या कन्या व स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या बडोदा येथील भगिनी श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांना थोरल्या बहीण म्हणून त्या एक चांगल्या आशीर्वादाचे छत्र मिळाले होत्या. मीही स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्ष राजकारण व समाजकारणात काम केले होते. जरी राजकारणात मतभेद असले तरी श्रीमंत हेमलताराजे गायकवाड यांच्याशी माझे चांगले ऋणानुबंध होते.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर भाषणात म्हणाले, समरजीत घाटगे यांनी निव्वळ संपत्तीच्या हव्यासापोटी कागलच्या जनतेच्या मालकीची असलेली ही जागा चुकीच्या पद्धतीने बळकवलेली आहे. ही जागा कागल शहरवासीयांना परत मिळालीच पाहिजे. राजा कसला हा तर भिकारीच आहे, असेही ते म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, महाराष्ट्र शासन आणि कागल शहरवासीयांच्या मालकीची असलेली ही जागा समरजीत घाटगे यांनी गुप्तपणे बळकावली आहे. ५० वर्षांपूर्वीच राजेशाही संपलेली आहे. ही जागा जनतेच्याच ताब्यात हवी.