आता अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही असणार 'सीसीटीव्ही'

कोल्हापूर : नुकताच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन सावदेकर यांच्या अंगावर एजंटाने रजिस्ट्रर फेकून, दमदाटी केली. संबंधित एजंटावर सरकारी कामात अडथळा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. एजंटांच्या वाढलेल्या धाडसाला कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीच जबाबदार असल्याची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती.
याच पार्श्वभूमीवर आता याला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्येही सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही एजंटाला अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये कायमस्वरुपी थांबण्यास मज्जाव केल्याच्या सूचना सर्वांना दिल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
केबिनमध्ये एजंट खुर्चीला खुर्ची लावून बसत असल्यास त्यांना तातडीने केबिन बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सर्वच कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र कार्यालयीन वेळेत घालण्याच्याही सूचना दिल्या आहेत. कार्यालयीन शिस्त न पाळणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जणार आहे. तसेच, ज्या एजंटांकडून अरेरावी होईल, दबाव टाकला जाईल, त्यांच्यावर ही कारवाईचा इशारा दिल्याचे भोर यांनी सांगितले