सुप्रिया सुळे यांनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट, म्हणाल्या अमित शहांनी मला शब्द दिलाय...

बीड :राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून त्यांनी या विषयात लक्ष घालेन असा शब्द दिला असल्याचं सांगितलं.
मी महाराष्ट्रातील खासदार नाहीतर महिला म्हणून मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. माझा पदर पुढे करणार आहे की आमच्या भावासाठी न्याय हवाय. अन्नत्यागाचं आंदोलन करू नका, तुम्ही आणि सगळे एकत्र लढू. बजरंग सोनवणे आणि मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, या विषयात लक्ष घालेन. मी पुन्हा पुन्हा सांगते आम्ही दोघे फोटो टाकू शकलो असतो. पण आम्ही केलं नाही. कारण एका गृहमंत्र्यांकडे आम्ही दोघे लोकशाही मार्गाने भेटून आलोत. माझी विनंती आहे की कोणीही गुन्हेगार असूदेच त्याची गय करू नका, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
कुठल्याही आईला आपलं मूल जाणं याच्यापेक्षा सर्वात जास्त दु:ख काय असू शकतं. या विषयामध्ये राजकारणी म्हणून कोणीही पडू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना संविधान देत अधिकार दिले पण या कुटुंबाला ६९ दिवस झालं न्याय मिळत नाहीये हे धक्कादायक आहे. ज्या काही घटना गेल्या आठ ते दहा दिवसात झाल्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. म्हणून मी ठरवलं की आता काहाही होऊदे, कोणी जबाबदारी घेऊ किंवा नाही माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार आहेत हा शब्द मी तुम्हाला देते. यामध्ये पक्ष नाही किंवा काही नाही. असंही सूळे म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांशी मतभेद पण...
आमचे आणि मुख्यमंत्र्यांचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत. पण त्यांच्याकडून खूप अपेक्ष होती. देशमुख कुटुंब त्यांना भेटल्यावर आठ दिवसात न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती. राजकारण चालत राहिलं, पण अशावेळी वरून एक सिग्नल दिला गेला पाहिजे. हे राज्य आता मी चालवतो या राज्यात अशी कोणतीही कृती सहन करणार नाही. प्रत्येक पोलिसाला समजलं पाहिजे आजपासून मधला नेता असेल त्यांचं खपवून घेतलं जाणार नाही, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.