स्वतंत्र लढ्यातील हुतात्म्यांना गारगोटीतील क्रांती चौकात अभिवादन
गारगोटी प्रतिनिधी : १३ डिसेंबर १९४२ रोजी गारगोटी कचेरीवर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेत असलेल्या सात वीर शहीदांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांना गारगोटीतील क्रांती चौकात भाजपच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यामध्ये हुतात्मा झालेले नारायण वारके (कलनाकवाडी), करवीराप्पा स्वामी (हुक्केरी), शंकरराव इंगळे (कापशी), तुकाराम भारमल (मुरगुड), मल्लाप्पा चौगुले (नाणीबाई चिखली), परशुराम साळुंखे (खडकलाट) आणि बळवंत जबडे (नाणीबाई चिखली) या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या कचाट्यातून भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार केला होता.
गारगोटी कचेरीवरील हल्ल्याचे उद्दिष्ट स्वातंत्र्यप्राप्ती. इंग्रज सरकारला हद्दपार करणे आणि कचेरीत अडकलेल्या अन्य क्रांतिकारकांना मुक्त करणे होते. मात्र, इंग्रजांच्या गोळीबारात या वीर शहीदांचा बलिदान झाला, पण त्यांचे योगदान आजही अनमोल आहे.
या हुतात्म्यांच्या स्मृतीला चिरकालीन ठेवण्यासाठी दरवर्षी गारगोटी क्रांती चौकातून क्रांती ज्योतींचे आयोजन केले जाते. ही ज्योत गारगोटी येथील शौर्यभूमीवर प्रज्वलित केली जाते, ज्यात स्थानिक नागरिक, क्रांतिकारी कार्यकर्ते आणि शाहू प्रेमी एकत्र येऊन श्रद्धांजली अर्पित करतात. त्यानंतर ही ज्योत हुतात्म्यांच्या जन्मगावी नेली जाते, जिथे विविध गावांमध्ये त्यांची शौर्यकथा आणि बलिदानाच्या स्मृतीला उजाळा दिला जातो.
या हुतात्म्यांचा बलिदान, त्यांचे धाडस आणि त्यांची शौर्यभूमी आजही कोल्हापुर आणि आसपासच्या परिसरात ऐतिहासिक कृत्य म्हणून जपली जात आहे.