आश्रमशाळांतील मुलींच्या वसतीगृहांमध्ये गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्या - राज्य मागासवर्ग आयोग सदस्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) - इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या आश्रमशाळेतील मुलींच्या वसतीगृहांना भेटी देऊन पाहणी करा. येथील मुलींना वसतीगृहांत मुलभूत सोयी - सुविधा मिळत असल्याची खात्री करा. आश्रमशाळांतील मुलींच्या वसतीगृहांमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्या, असे सांगून जात प्रमाणपत्रांच्या वितरणाची संख्या जास्त असल्यास शिबिरांचे आयोजन करुन जात प्रमाणपत्र प्रकरणे निकाली काढा, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी दिल्या.
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. मच्छिंद्रनाथ तांबे, प्रा. डॉ. गोविंद काळे, व डॉ. मारुती शिकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कुलवाडी, कुळवाडी या जात समूहाबाबत चर्चा तसेच १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीतील इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गास वितरित केलेली जात प्रमाणपत्रे व जात वैधता प्रमाणपत्र आणि आश्रमशाळांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा तसेच जिल्हयातील आढावा बैठक घेण्यात आली.
जात प्रमाणपत्राचे वितरण, जात प्रमाणपत्र पडताळणी यांत काही अडचण आल्यास राज्य मागासवर्ग आयोगाला माहिती द्यावी, या अडचणींचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल, असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यासह जिल्ह्यातील कुलवाडी, कुळवाडीच्या नोंदीची माहिती घेऊन कुणबी, कुळवाडी संमिश्र नोंदी बाबतचा तालुकानिहाय आढावा घेतला.
१ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीतील इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती संवर्गास वितरित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांची व जात वैधता प्रमाणपत्रांची माहिती घेऊन या प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठीच्या उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.
तालुकास्तरावर जात वैधता प्रमाणपत्रे जलदगतीने देण्यासाठी योग्य नियोजन करा. जिल्ह्यातील आश्रमशाळांना अचानक भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करा. वसतीगृहांमध्ये स्वच्छता, भोजन, मुला मुलींची सुरक्षा, आरोग्य सुविधा यांची नियमित तपासणी करा, अशा सूचना सदस्यांनी दिल्या.
डॉ.स्वाती देशमुख- पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी कुलवाडी कुळवाडी जात समूह तसेच विविध संवर्गांना वितरित केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रांबाबत माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष डॉ.स्वाती देशमुख -पाटील, संशोधन अधिकारी संभाजी पोवार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक सुनिता नेर्लीकर तसेच उपविभागीय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.