करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी; मनसेची मागणी

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळी पावसासह जोरदार गारपीट यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम मिळाली अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.
करवीर तालुक्यातील खुपिरे, कोपार्डे, वाकरे, कुडित्रे आणि दोनवडे या गावांमध्ये वादळी पावसासह जोरदार गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेल्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच असमानीसह इतर संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकरी बांधव तीव्र संकटामध्ये सापडला आहे. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यातच गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.
याबाबत प्रशासनाने पंचनामे करुन पुढे अहवाल सादर केला असता, राज्य सरकार व संबंधित प्रशासनाने त्याची दखल घेत, नुकसान भरपाई आपल्या जिल्हा प्रशासनास अदा केली आहे. पण संबंधीत विभागाने नुकसान भरपाईचा निधी गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना अजून ही वितरित केलेला नाही. येत्या ८ दिवसात नुकसान भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना मिळाली नाही तर तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला आहे.
मनसेचे कोल्हापूर जिल्हा सचिव प्रसाद पाटील आणि नगरसेवक राजू दादा दिंडोर्ले यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत "जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे सायंकाळी सात वाजता निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी संजय तेली यांनी संबंधित विभागाला याबाबतचे आदेश दिले असून संबंधित विभागाने दोन दिवसांत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे कोल्हापूर पश्चिम भागातील करवीर, पन्हाळा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शरद जाधव, विक्रम नरके, अमित बंगे, कृष्णात कांबळे, अरविंद कांबळे, कोपार्डे चे तुकाराम पाटील,(हुजरे), विष्णू पाटील (हुजरे), युवराज पाटील, नवनाथ पाटील, बाळासो साळुंखे, तानाजी पाटील, अनिल पाटील, बापट पाटील, अभिजीत पाटील यांच्यासह अन्य गारपीट ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.