कुडीत्रेच्या "यशवंत बँके"ची चौकशी होणार..!

कुडीत्रेच्या "यशवंत बँके"ची चौकशी होणार..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कुडीत्रे येथील यशवंत सहकारी बँकेची चौकशी होणार आहे. सहकार कलम 83 नुसार जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी या चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये 2012-13 पासून 2019 व 2020-22 मध्ये झालेल्या नोकर भरतीची चौकशी होणार आहे. यासाठी पन्हाळ्याचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

या चौकशीमुळे करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यात खळबळ उडाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली असून देखील संचालक मंडळाने आपल्या कार्यकाळात 2020 आणि 2023 अशी दोन वेळा नोकरी भरती केल्याने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने 13 सप्टेंबर 2023 रोजी आंदोलनातून थेट पुराव्यासहित आरोप केले गेले होते. या आरोपांची दखल घेऊन विनाविलंब कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या चौकशीतून यशवंत बँकेच्या संचालक मंडळावर कोणते आरोप सिद्ध होतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. जर संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर बँकेची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते.

..हे आहे चौकशीचे कारण

• संचालक मंडळाने दोन वर्षांपूर्वी संपलेल्या मुदतीत नोकरी भरती केली.

• नोकरी भरतीसाठी खोटे कागदपत्रे तयार करण्यात आली.

या केल्या गेलेल्या आरोपानंतर सहायक निबंधक नारायण परजणे यांनी लवकरच चौकशीला सुरुवात करणार आहेत. चौकशीचा अहवाल सहकार विभागाला सादर केला जाईल. त्यानंतर सहकार विभाग त्यानुसार कारवाई करेल.