जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांचा कार्यकर्त्यांसह के. पीं. ना पाठिंबा

जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांचा कार्यकर्त्यांसह के. पीं. ना पाठिंबा

राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी तथा शिवसेनेचे उमेदवार के पी. पाटील यांना जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील -कंथेवाडीकर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. पाटील यांच्याबरोबरच राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातून रोजच पाठिंब्याचे सूत्र सुरूच असून के पी पाटील यांना बळ मिळत असल्याचे चित्र आहे.

पाठिंबा जाहीर करण्याची आपली भूमिका स्पष्ट करताना वसंतराव पाटील म्हणाले," राज्यात महागाईने कहर माजविला असून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नाही, बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा अनेक प्रश्नांच्या गर्दीत हे महायुतीचे सरकार अडकले असून जनतेच्या भल्यासाठी यांनी काहीही केले नाही. अशा अपयशी ठरलेल्या सरकारमुळे राधानगरी मतदारसंघातील अनेक प्रश्नांचे घोंगडे भिजत राहिले असून गेल्या दहा वर्षांत त्यांची सोडवणूक झालेली नाही. त्यामुळे पुरोगामी विचाराचे पाईक असलेले व समाजभान जपणारे माजी आमदार के पी पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून या मतदार संघाला ते न्याय देऊ शकतील अशी आमची खात्री असल्याने राधानगरी तालुक्यातील जनता दलाच्या कार्यकर्त्यांसह मी त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे."

यावेळी मोहडेचे उपसरपंच पांडुरंग ऱ्हायकर म्हणाले," राधानगरी मतदार संघाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य के पी पाटील यांच्याकडे असल्यामुळे मतदार संघाच्या हितासाठी आम्ही जनता दलाचे शेकडो कार्यकर्ते त्यांच्या विजयासाठी जिवाचे रान करू."

यावेळी जनता दलाचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

*वाढत्या पाठिंब्याने के पी ना हत्तीचे बळ*

के पी पाटील यांची उमेदवारी योग्य असल्याचे स्पष्ट करीत आजऱ्याचे ज्येष्ठ नेते जयवंत शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, आजरा तालुका छत्रपती शिवाजी,फुले,आंबेडकर संघटनेचे अजय देशमुख तसेच मुस्लिम संघटनांसह अनेक नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला असून प्रचार सभांमधून हे सर्व सक्रिय झाले आहेत. याबरोबरच राधानगरीतून शेतकरी कामगार पक्ष,जनता दल, गोकूळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे,दीपसिंह नवणे, वंचित बहुजन आघाडी आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पाठिंबाही के पी पाटील यांना मिळत असल्याने त्यांच्यासाठी हे जणू हत्तीचे बळ ठरत आहे.