केडीसीसी बँकेच्यावतीने रोजगार निर्मितीसाठी अर्थ पुरवठ्याची मंजुरीपत्रे

कागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मंजूर केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कर्जमंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेने अश्या हजारो युवकांना रोजगार करण्याची संधी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातून करून दिल्याबद्दल सर्व मंजूर धारकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना माने म्हणाले, केडीसीसी बँकेच्या माध्यमातून विविध समाजाच्या बेरोजगार युवक- युवतींना छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला जातो. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे मराठा समाजासह, परशुराम आर्थिक विकास महामंडळाद्वारे ब्राह्मण समाजातील युवक- युवतींना, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा केला आहे. या उपक्रमांतर्गत रोजगार निर्मितीसाठी बँक नेहमीच अग्रेसर आहे. आत्तापर्यंत हजारो युवक- युवतींना रोजगार निर्मितीसाठी कोट्यावधी रुपयांचा अर्थपुरवठा बँकेने केला आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, बाळासाहेब तुरंबे-साकेकर, नामदेव चौगुले-वंदूर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेअंतर्गत अर्थ पुरवठा मंजूर झालेल्यांची नावे :
नीलम सागर बाचणकर - साके, निलेश निवृत्ती इंगळे - वंदूर, योगेश धनाजी मोरे - सुरुपली, रावसाहेब भीमा खाडे - व्हन्नूर, मारुती पोवार - एकोंडी, प्रकाश वाडकर - व्हन्नाळी. यावेळी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या कर्ज योजनेअंतर्गत माशुक झाकीर मुल्ला रा. कसबा सांगाव यांनाही अर्थ पुरवठ्याचे मंजुरी पत्र देण्यात आले.