कोपरगावजवळ दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

कोपरगावजवळ  दाम्पत्याचा भीषण अपघात; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

अहिल्यानगर - अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील साकुरी येथे दहाव्याचा कार्यक्रम आटोपून येवला तालुक्यातील नगरसुलकडे परतणाऱ्या दाम्पत्याचा कोपरगावजवळ भीषण अपघात झाला. शुक्रवारी, 20 जून रोजी दुपारी सुमारे 12 वाजता कोपरगाव येथील येवला नाका परिसरात हा अपघात घडला. अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या संगीता महाले (वय 55, रा. नगरसुल, ता. येवला, जि. नाशिक) या महिला कंटेनरच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाल्या, तर त्यांचे पती रामकृष्ण महाले हे जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यालगत उभ्या असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक व ट्रॅक्टरमुळे हा अपघात घडल्याचा आरोप आहे. घटनास्थळी कोपरगाव पोलीस तात्काळ दाखल झाले व वाहतूक सुरळीत केली. काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पोलीसांनी घटनास्थळावरून एक कंटेनर आणि ऊस भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी ऊस वाहतुकीसाठी खासगी व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या कडेला वाहनं उभी न करता योग्य जागेचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वीही या भागात अशाच प्रकारचे अपघात घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. ही घटना संपूर्ण कोपरगाव परिसरात हळहळ निर्माण करणारी ठरली आहे.