खडतर संघर्षातून बिरदेव डोणे बनला आयपीएस अधिकारी

कोल्हापूर (अमृता बुगले ) : आई-वडिलांचे लहानपणापासून पाहिलेले दुःख दारिद्र्य कधीच स्वस्त बसू देत नव्हते. घरात लाईट नसतानाही दिवाच्या प्रकाशात एकाग्रतेने अभ्यासात मग्न असणारा. काहीतरी वेगळे करण्याची जिद्द उराशी बाळगून सातत्याने अभ्यास हाच ध्यास घेतला होता. कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याचा निर्णय घेतलेला सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे.
बिरदेव डोणे हा रा. यमगे, ता.कागल, जि. कोल्हापूर येथील एका मेंढपाळाचा मुलगा असून त्याने त्याच्या कष्टाला जिद्दीची जोड देत बनला आयपीएस अधिकारी. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बिरदेव याने देशात 551वी रँक मिळवली आहे. बिरदेव हा शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुडचा विद्यार्थी आहे . बिरदेव दहावीच्या परीक्षेत 96 टक्के मिळवून मुरगुड केंद्रात पहिला आला होता. त्यानंतर बारावीत असताना विज्ञान शाखेतून 89 टक्के मार्क मिळवत तालुक्यात आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. बिरदेव याने पुणे सी. ई. ओ. पी या ठिकाणी स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले आहे.
पहिल्यापासूनच शिक्षणाची, अभ्यासाची, स्पर्धा परीक्षांची ओढ बिरदेवला होती. त्यामुळे सातत्याने अभ्यासात मग्न असणाऱ्या बिरदेवने पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आणि आपल्या आई-वडिलांची, आपल्या गावाची मान अभिमानाने उंचावली.
ग्रामस्थ करणार जंगी स्वागत
बिरदेवचे वडिल म्हणतात, परीक्षेदिवशी बिरदेवची तब्येत बिघडली होती आणि छोटी शस्त्रक्रियाही केली होती.अशा अवस्थेत असताना देखील त्याने परीक्षा दिली आणि त्याने घेतलेल्या कष्टाचं चीज झालं. पोरानं लय कष्ट केलं असल्याच्या भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत. बिरदेव आपल्या आई- वडिलांसह रविवारी गावी परतणार आहे. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्याचे नियोजन यमगे ग्रामस्थांनी केले आहे. मूरगूड येथील शिवतीर्थ ते शिंदेवाडी, यमगे अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तालुक्यातील बिरदेव हा पहिला आयपीएस अधिकारी ठरला आहे.