माझी वसुंधरा अभियानात कागल नगरपरिषदेस राज्यस्थरीय उत्तेजनार्थ पुरस्कार
कागल (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबधित पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान राबविण्यात आले. या अभियानात कागल नगरपरिषदेस राज्यस्थरीय उत्तेजनार्थ १.५ कोटीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या अभियानामध्ये राज्यातील ४१४ नागरी स्वराज्य संस्था यांनी सहभाग घेतला होता. तरी या अभियानाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या त्रयस्थ यंत्रणामार्फत मूल्यमापन करण्यात आले. अभियान कालावधी मध्ये शासनाकडे सादर करण्यात आलेला माझी वसुंधरा अभियान प्रगती अहवाल आणि प्रगती अहवालाच्या अनुषंगाने त्रयस्त समितीद्वारे क्षेत्रीय मूल्यमापन (प्रत्यक्ष स्थळ पाहणी) या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे पंचतत्वांचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या माझी वसुंधरा अभियान ४.० सन २०२३-२०२४ च्या स्पर्धेत लोकसंख्या निहाय पुरस्कारा अंतर्गत कागल नगरपरिषदेस राज्यस्थरीय उत्तेजनार्थ १.५ कोटीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तरी, या अभियानच्या लोक चळवळीमध्ये स्वच्छता बॅण्ड अॅम्बॅसिडर नामदार हसनसो मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण व विशेष साह्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांचे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राबिविण्यात आलेल्या विविध विकास कामां मध्ये मोलाचे योगदान व इतर सहकार्य लाभले आहे.
या उपक्रमास प्रशासक तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व या अभियानाचे नोडल अधिकारी नितीन कांबळे, स्वच्छता निरिक्षक दस्तगीर पखाली, शहर समन्वय अधिकारी आशिष शिंगण, पाणी पुरवठा अभियंता विजय पाटील व सर्व कायम व कंत्राटी आरोग्य विभाग कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यावेळी इतर सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, नागरिक, बंधू-भगिनी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, सर्व शाळा, कॉलेज, हायस्कूल, पर्यावरण संस्था, यांचे योगदान लाभले.