गणवेश शिलाईतून माविमच्या बचत गट महिलांना मिळाला स्वयंरोजगार

गणवेश शिलाईतून माविमच्या बचत गट  महिलांना मिळाला स्वयंरोजगार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यासाठी हे गणवेश तयार करण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळ च्या(माविम) महिला बचत गटामार्फत केले जात आहे. याचे वाटप  सुरु झाले. प्राथमिक शिक्षण परिषदने यासाठी सहकार्य केले आहे. 

 कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १२ तालुके व कोल्हापूर शहर असे १३ ठिकाणच्या शाळांना  गणवेश देण्यात येणार आहेत. त्यापैकी नियमित गणवेश तयार करून ते शाळांना प्रथम देण्यात येणार आहे यामध्ये नियमित गणवेश संख्या ही १ लाख ८३ हजार ७२६ इतकी आहे. माविम मार्फत स्थापित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत गारमेंट युनिट, बचत गटातील महिलांना गणवेश शिलाईचे काम देण्यात आले आहे. यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व महिलांना आर्थिक लाभ मिळावा हा मुख्य हेतू आहे. याउपक्रमातून जिल्ह्यातील एकूण ८ गारमेंट मधील ४३८ महिलांना रोजगार मिळाला. कागल तालुक्यातील कागल, पिंपळगाव खुर्द, शेंदूर या केंद्रशाळेत गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, वरिष्ठ लेखा लिपीक प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन  कांबळे यांच्या हस्ते शाळांना गणवेश वाटप करण्यात आले.  

गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे स्कोप मापिंग करण्यात आले. महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती ड्रेस शिवतात याची संख्या काढण्यात आली आहे त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे. माविम आणि सीएमआरसीमध्ये तसेच सीएमआरसी व शिवणकाम करणाऱ्या महिलेमध्ये गणवेश शिलाई कामाकरिता करार करण्यात आले आहेत .  गणवेशाच्‍या कामामुळे महिलांना मोठा आर्थिक लाभ झाल्‍याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी  कांबळे यांनी दिली. 

या उपक्रमासाठी माविमच्या मुंबई येथील व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे, शिक्षणाधिकारी मीना शेडकर, उपशिक्षणाधिकारी शंकर यादव , शशिकांत कदम जिल्हा कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा व गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील यांचे सहकार्य मिळाले.