गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : रत्नागिरी -नागपूर महामार्ग असताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास का धरला जातोय? ८६ हजार कोटीचा रस्ता करून २७ हजार शेतकऱ्यांना उघड्यावर टाकण्याचे काम का केले जात आहे असा सवाल विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी विधानपरिषदेत उपस्थित केला.
राज्यात प्रकल्पाच्या माध्यमातून विकास करतोय असे वातावरण केले जात आहे. समृद्धीची चर्चा होते, पण समृद्धीचा दोन वर्षातला टोल ५०० कोटींवर गेलेला नाही. अपेक्षित टोल समृद्धी महामार्गाकडून मिळाला नसल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. निवडणुकीपूर्वी हा महामार्ग रद्द करण्याची भूमिका महायुतीने कोल्हापुरात घेतली होती. पण आता महायुतीचे आमदारच शक्तीपीठाच्या समर्थनार्थ बैठका घेत आहेत ही जनतेची फसवणूक नव्हे का असा सवाल करत शक्तीपीठ महामार्ग गरजेचा नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.