उंब्रजकरांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या "या" ठिकाणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उंब्रजकरांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या "या" ठिकाणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उंब्रजकरांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या "या" ठिकाणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

 

उंब्रज विभाग प्रतिनिधी/रघुनाथ थोरात

 

 

उंब्रज,ता कराड गावच्या हद्दीमध्ये महावितरण कार्यालयाच्या परिसरात पाटण पंढरपूर राज्य मार्गावरील हे ठिकाण उंब्रजकरांसाठी साक्षात मृत्यूचा सापळा बनले असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान,या ठिकाणी दररोज छोट्या-मोठ्या दुर्घटनांची मालिका सतत सुरू असते. त्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या या ठिकाणी एखादी मोठी गंभीर दुर्घटना होऊन बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असं संतप्त सवाल उंब्रजकर विचारत आहेत. या ठिकाणी पाटण पंढरपूर राज्य मार्गावर भला मोठा महाकाय खड्डा पडला आहे. तो इतका महाकाय आहे की जवळपास निम्मा रस्ता त्या खड्ड्याने व्यापून टाकला आहे. सदरचा खड्डा पडून जवळपास एक वर्ष होत आले तरीसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे लक्ष गेले नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणाहून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.खड्डा चुकवण्याच्या नादात वाहनधारक वाहने रस्त्याच्या मधोमध चालवत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस समोरासमोर धडक होऊन छोट्या मोठ्या अपघातांची मालिका येथे सतत सुरू असते. या परिसरात एक मोठे नामांकित हॉस्पिटल तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा असल्यामुळे या ठिकाणावरून सतत रुग्णांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचा राबता सुरू असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच वयोवृद्ध रुग्णांसाठी या ठिकाणचा प्रवास धोकादायक बनला आहे.सदरचा महाकाय खड्डा चुकवण्याच्या नादात रात्रीच्या वेळेस अंदाज न आल्यामुळे अनेक दुचाकींवर पाठीमागे बेसावध अवस्थेत बसलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून वयोवृद्ध नागरिक,महिला, शालेय विद्यार्थी तसेच रुग्ण यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित सदरचा महाकाय खड्डा भरून घेऊन दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा उंब्रजकर नागरिकांनी दिला आहे.