जिल्हा परिषदेतील अनुकंपाची ज्येष्ठता यादी जाहीर

जिल्हा परिषदेतील अनुकंपाची ज्येष्ठता यादी जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्हा परिषदेमध्ये करण्यात येणाऱ्या अनुकंपा भरतीसाठी अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीवर काही हरकती असतील, ज्यांची कागदपत्रे अपूर्ण असतील तर त्याची पूर्तता ३ फेब्रुवारीपर्यंत करता येईल. अर्जदाराने समक्ष उपस्थित राहणे बंधनकारक असून, मुदतीनंतर आलेल्या हरकती किंवा दुरुस्तीचा विचार केला जाणार नाही, असे पत्रक उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी दिले आहे.

जिल्हा परिषदेकडील गट क व गट ड मधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा योजनेखाली नोकरी मिळावी म्हणून आलेल्या अर्जाची सन २०२४ अखेरची संभाव्य ज्येष्ठता यादी तयार केली आहे. त्यामध्ये उमेदवारांचे जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर एकूण ३५ व त्यापूर्वीचे ३१ असे एकूण ६६ उमेदवारांची नावे समाविष्ट असून, त्यापैकी १३ उमेदवारांचे प्रस्ताव निकाली काढले आहेत. त्यामुळे ५३ उमेदवारांचे अर्ज सध्या प्रलंबित आहेत. त्याची यादी जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये पूर्ण अर्ज, अपूर्ण अर्ज व निकाली काढलेले अर्ज असे स्वतंत्रपणे दाखविण्यात आले आहेत.