तुम्हाला कन्नड येत का ? ; कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्याला फासलं काळं

कोल्हापूर : महाराष्ट्र सीमेच्या लगत असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती आणि कन्नड रक्षक वेदिका या कानडी संघटनेकडून मराठी भाषिकांवर होणारे अत्याचार यामुळे मराठी भाषिक त्रस्त असल्याचं वेळोवेळी दिसून आलंय.
कालच पुन्हा एकदा याचा प्रत्यय आलाय. रात्री कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीला टार्गेट करत कर्नाटक हद्दीतील पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चित्रदुर्ग येथे एसटीला आणि एसटी कर्मचाऱ्याला कन्नड येतं का विचारत काळं फासलं आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांमध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आजपर्यंत सीमावादाचा आणि भाषावादाचा मुद्दा पुढे आला की सर्वात आधी एसटी महामंडळाच्या गाड्यांना टार्गेट केलं जातं. काल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बेंगलोर मुंबई एस टी क्रमांक MH14 KQ 7714 ही एसटी चालक भास्कर जाधव चित्रदुर्ग येथून कोल्हापूरच्या दिशेने येत होते. यावेळी रात्री साडेनऊच्या सुमारास कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी अचानक एसटी अडवली. चालकास कन्नड येत का अशी विचारणा केली. कन्नड येत नसल्याचे सांगितल्यानंतर कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चालकास एसटीतून खाली उतरवल आणि तोंडाला काळ फासत कन्नड येत नसेल तर कर्नाटकात येऊ देणार नाही अशी जोरदार घोषणाबाजी करू लागले. या घटनेमुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून आम्हाला सुरक्षा मिळाली नाही तर आम्ही कर्नाटकात गाड्या घेऊन जाणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शिवाय या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रात देखील उमटण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेना ठाकरे गट आक्रमक
रात्री घडलेल्या या घटनेनंतर कोल्हापुरात याचे पडसाद उमटले आहेत. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने याचा निषेध करण्यात आला आहे. ठाकरे शिवसेना याबाबत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकावर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत या घटनेचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. भाषावादाचा हा मुद्दा आता आणखीनच चिघळणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतय.