अभ्यासक्रमांबाबत जागृती नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थीसंख्या घटली ; उच्चशिक्षणमंत्र्यांचीच कबुली

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या १४ अधिविभागांतील विद्यार्थी संख्या घटली असून विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहचत नसल्याने ही संख्या कमी झाल्याची कबुली उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधापरिषदेत दिली. आमदार सतेज पाटील यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न अधिवेशनात उपस्थित केला.
विद्यापीठात सध्या २५० हून अधिक अभ्यासक्रम शिकवले जातात. मात्र, रोजगाराच्या संधींशी सांगड न घातल्याने १४ अधिविभागात २०२३-२४ या वर्षात प्रवेश क्षमतेइतकेही विद्यार्थी मिळाले नाहीत. मानव्यशास्त्र शाखेतही विद्यार्थी संख्या कमी होत असल्याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले होते. सध्याचे अभ्यासक्रम कालसुसंगत नसल्याने नव्या शैक्षणिक धोरणात ज्या पद्धतीने बदल अपेक्षित आहेत त्या गतीने बदल करुन हे अभ्यासक्रम रोजगाराभिमुख करण्यासाठी काय उपाययोजना केली आहे असा प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला.
यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेचा आढावा समितीच्या अहवालानुसार १४ अधिविभागातील अभ्यासक्रमांना प्रवेशक्षमतेपेक्षाही कमी प्रवेश झाल्याची कबुली दिली. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये व संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण केंद्रांची संख्या वाढल्याने त्या महाविद्यालयांमधून विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहितीही पुरेशा प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्यानेही ही संख्या घटल्याचे मंत्री पाटील यांनी मान्य केले.
किती अभ्यासक्रम रोजगाराभिमुख ?
कमी कालावधीचे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु आहेत का, असल्यास त्यातून किती विद्यार्थ्यांना राेजगार मिळाला असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला. यावर मंत्री पाटील यांनी नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यापीठाने कौशल्यआधारित अभ्यासक्रम तयार केले असून २०२४-२५ पासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु केल्याचे सांगितले.