देश प्रथम क्रमांकावर येण्यासाठी तरुणांनी कठोर परिश्रम करावेत : नारायण मूर्ती
कोलकाता : आपला देश जगात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी तरुणांनी कठोर परिश्रम करायला पाहिजेत. तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे. असे विधान परत एकदा इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले. मूर्ती यांनी वर्कलाइफ बॅलन्सबाबत हेच विधान केले होते.या विधानावर अजूनही ते ठाम आहेत.
कोलकाता येथील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन करण्यासाठी नारायण मूर्ती कोलकाता येथे आले होते. यावेळी मूर्ती म्हणाले की, तरुणांना समजले पाहिजे की “आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील आणि भारताला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.” कार्यक्रमात आर. पी. एस. जी. समुहाचे अध्यक्ष संजीव गोयंका यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांनी म्हटले की, “इन्फोसिसमध्ये मी म्हणालो की आम्ही सर्वोत्तम ठिकाणी जाऊ आणि सर्वोत्तम जागतिक कंपन्यांशी स्वतःची तुलना करू. एकदा आपण सर्वोत्कृष्ट जागतिक कंपन्यांशी आपली तुलना केली की, मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्या भारतीयांना खूप काही करायचे आहे. आम्हाला आमच्या आकांक्षा उंचावल्या लागतील कारण ८०० दशलक्ष भारतीयांना मोफत रेशन मिळत आहे. म्हणजे ८०० दशलक्ष भारतीय गरिबीत आहेत. जर आम्ही कठोर परिश्रम करण्याच्या स्थितीत नसलो तर, कोण परिश्रम करेल?”