चुलत बहिनीसोबत राहत होता लिव्हइनमध्ये, भांडण झालं अन् त्यानं उचललं टोकाचं पाऊल

चुलत बहिनीसोबत राहत होता लिव्हइनमध्ये, भांडण झालं अन् त्यानं उचललं टोकाचं पाऊल

नवी दिल्ली: एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या चुलत बहिणीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये टाकला आणि त्यानंतर ती सुटकेस पेटवून दिली. ही घटना दिल्लीतील गाझीपूरमध्ये उघडकीस आली आहे.शिल्पा पांडे असं मृत तरूणीचं नाव आहे. 

हे दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून एकत्र राहत होते. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी मुलावर  लग्नासाठी दबाव टाकत होती, तर तरुणाला हे नातं संपवायचं होतं. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर मुलाने तिची हत्या केली.

रविवारी (२६ जानेवारी) पोलिसांना गाझीपूरमधील निर्जन ठिकाणी एक सुटकेस सापडल्याची माहिती मिळाली. तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांना सुटकेसमध्ये जळालेला मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला होता.

असा लागला खुनाचा छडा

पूर्व दिल्लीचे डीएसपी अभिषेक धनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला या प्रकरणी काहीही सुगावा लागलेला नव्हता. आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीमध्ये आम्हाला ह्युंदाई वेर्ना वाहन दिसले, जे मृतदेह सापडण्याच्या काही तास आधी या परिसरातून गेले होते. पोलिसांनी कारचा नोंदणी क्रमांक शोधून त्याच्या मालकाची चौकशी केली. त्याने ही कार अतिम तिवारी नावाच्या व्यक्तीला विकल्याचे सांगितले.

दारुच्या नशेत गळा दाबला 

पोलिसांनी २२ वर्षीय अमित तिवारीला शोधून काढले आणि त्याला ताब्यात घेतले. तो गाझियाबादमध्ये राहत होता आणि कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा मित्र अनुज कुमारही दिसत होता, त्यामुळे पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. अनुज वेल्डिंग मेकॅनिक म्हणून काम करत होता आणि गाझियाबादमध्ये राहत होता.

डीएसपी अभिषेक धनिया यांनी सांगितले की, त्यांनी अमितला ग्रेटर नोएडा येथून अटक केल. दारूच्या नशेत अमितने शिल्पाचा गळा दाबून खून केला आणि तिचा मृतदेह सुटकेसमध्ये ठेवला.

निर्जन भागात सुटकेस पेटवून दिली 

अमितची सुरुवातीची योजना पश्चिम उत्तर प्रदेशात कुठेतरी मृतदेह टाकून देण्याची होती. पण जेव्हा तो मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला तेव्हा दोन चौकी ओलांडल्यानंतर अमितने ठरवले की मृतदेह जवळच कुठेतरी फेकून द्यावा. त्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावरून १६० रुपये किमतीचे डिझेल घेतले आणि निर्जन भागात पोहोचल्यानंतर सुटकेस पेटवून दिली आणि तिथून पळ काढला.