प्राध्यपकांना मारहाण प्रकरणी तिघांना अटक

प्राध्यपकांना मारहाण प्रकरणी तिघांना अटक

रत्नागिरी : गुहागर (जि. रत्नागिरी)  येथील खरे ढेरे भोसले उच्च महाविद्यालयातील चार प्राध्यापकांना सात आठ जणांनी जबर मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. याची जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गंभीर दखल घेऊन तिघांना अटक केले. याप्रकरणी पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष महेश भोसले, सचिव संदिप भोसले, रोहन भोसले आणि ४ ते ५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर संदीप आत्माराम भोसले, अजित अशोक सुर्वे, राकेश कमळकर साखरकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजता गोविंद सानप, प्रा. संतोष जाधव व प्रा. अनिल हिरगोंड हे तिघे हिरगोंड यांच्या चारचाकी वाहनाने शृंगारतळीहून गुहागर कॉलेजच्या दिशेने निघाले होते. गुहागर चिपळूण मुख्य रस्त्यावरुन खरे ढेरे भोसले महाविद्यालयाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर त्यांचे वाहन आले. तेव्हाच समोरुन संस्थेचे संचालक संदीप भोसले हे आपल्या चारचाकी वाहनाने येत होते. त्यांनी वाहन थांबवले आणि त्यांनी ४ ते ५ जणांसह मिळून हिरगोंड यांच्या वाहनाजवळ येऊन त्यांना सुनावले. तुम्ही संस्थेच्या विरोधात काम करता, आमचे काम करत नाही, आमच्या विरोधात बाहेर काहीही बोलता, असे बोलून हिरगोंड यांना मारले. त्यानंतर प्रा.सानप आणि प्रा.जाधव गाडीतून खाली उतरुन संदीप भोसले यांना असे का करता, आपण बसुन बोलुयात असे सांगत होते. तोपर्यंत त्यांनाही त्यांच्यासोबत असलेल्या माणसांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.