प्रो.डॉ. सिद्राम खोत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

प्रो.डॉ. सिद्राम खोत यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

मलकापूर प्रतिनिधी :- रोहित पास्ते 

रयत शिक्षण संस्थेचे मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालयातील हिंदी विभागाचे प्रमुख व शिवाजी विद्यापीठ हिंदी अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी गावचे सुपुत्र प्रो. डॉ. सिद्राम कृष्णा खोत यांच्या समाचार 'लेखन एंव संपादन' या हिंदी ग्रंथास नुकताच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा बाबुराव विष्णू पराडकर पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. ३५ हजार रुपये रोख व सुवर्णपदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

      आज पर्यंत दहा हिंदी पुस्तके व पाच मराठी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ५९ शोधनिबंध त्यांचे प्रकाशित आहेत. कोल्हापूर व सांगली आकाशवाणी वरून सतरा व्याख्याने त्यांनी दिली आहेत. सेमिनार, परिषद व विविध शाळा महाविद्यालयात विविध विषयावर त्यांनी १३५ आजपर्यंत व्याख्याने दिली आहेत .विद्यापीठ अनुदान आयोग, दिल्ली यांनी दिलेल्या एक लाख रुपये या सहकार्यामुळे 'जनसंचार एंव पत्रकारिता कल और आज'या विषयावर मायनर रिसर्च प्रोजेक्ट ही त्यांनी पूर्ण केला आहे. महाविद्यालयाने व रयत शिक्षण संस्थेने दिलेल्या अनुदानातून 'पत्रकारिता के बदलते तेवर' या विषयावर एक रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. याबरोबरच 'भटक्या जमातीच्या शैक्षणिक समस्या आणि उपाय योजना' या रिसर्च प्रोजेक्टचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बी.ए.भाग तीन साठी असलेल्या साहित्यशास्त्र या पुस्तकाचे ते लेखक आहेत. केंद्रीय हिंदी निदेशालय मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी प्रो डॉ.खोत यांनी लिहिलेल्या हिंदी पुस्तकाच्या दोनशे पन्नास प्रती खरेदी केलेल्या आहेत. विविध वर्तमानपत्रात त्यांचे २३ लेख प्रसिद्ध झाले आहेत.

     त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच प्राध्यापक पीएच.डी. करीत आहेत.त्यांच्या विविध ग्रंथास सात पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत. करवीर साहित्य परिषद, कोल्हापूर यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा विशेष पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय ,पाडळी यांचा ज्ञान माऊली ग्रंथ पुरस्कार, नारी निकेतन वडूज सातारा यांचा राज्यस्तरीय राज्यरत्न सदभावना पुरस्कार, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा पुणे यांचा राष्ट्रभाषा प्रचारक पुरस्कार, वंदना प्रकाशन, मुंबई यांचा आशीर्वाद पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ चंद्रकुमार नलगे सार्वजनिक वाचनालय उजळाइवाड़ी, कोल्हापुर यांचा उत्कृष्ट निर्मिती ग्रंथ पुरस्कार मिळालेला आहे.

   रयत शिक्षण संस्थेचे सचिव, प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर व सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एन.घोलप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.