बस स्थानकात थांबवली आणि काही क्षणातच चालकाची प्रानज्योत मालवली

बस स्थानकात थांबवली आणि काही क्षणातच चालकाची प्रानज्योत मालवली

बारामती : बस स्थानकात थांबवली आणि हृदयाचा तीव्र झटका आला... काही क्षणातच चालकाची प्रानज्योत मालवली. चालकाने असह्य वेदना सहन करत जवळ आलेल्या जेजुरी बसस्थानकावर बस आणली आणि हि घटना घडली. मृत्यूची चाहूल लागली असताना आणि लवकरच  मृत्यू होणार याची जाणीव झाली असताना चालकाने प्रवाशांच्या जीविताला जराही धक्का बसू नये याची शेवटच्या क्षणापर्यंत काळजी घेतली. निलेश एकनाथ शेवाळे (वय ५२) असे या एसटी बस चालकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे प्रवाशांसह बारामती आगारात शोककळा पसरली.

 बारामती आगारात निलेश एकनाथ शेवाळे कार्यरत होते. ते गुरुवारी मुरुम येथून पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांना जेजुरी बसस्थानकाच्या अलीकडे छातीत जळजळ व्हायला लागली होती.  सकाळी साडेदहा वाजता बस जेजुरी बस थानकात थांबल्यानंतर शेवाळे यांना  हृदयविकाराच्या तीव्र धक्का आला आणि ते स्थानकारवरच बेशुध्द पडले. यावेळी त्यांना कर्मचाऱ्यांनी तात्काळ जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे तेथील डाॅक्टरांनी सांगितले. 

एसटी बसमध्ये काही प्रवाशी देखील होते. बस जेजुरी आगारात आल्यानंतर या चालकाला हृदयविकाराचा धक्का आला, जर बस चालवत असताना असं झालं असतं तर कदाचित मोठी दुर्घटना घडू शकली असती अशी चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती. मात्र, बस चालकासोबत ही दुर्दैवी घटना घडल्याने साऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.