बांगलादेशातील उद्रेकाचा फटका: भारताची कांदा निर्यात थांबली

बांगलादेशातील उद्रेकाचा फटका: भारताची कांदा निर्यात थांबली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशात झालेल्या उद्रेकाचा परिणाम आता भारतातील कांदा निर्यातीवर होवू लागला आहे. बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीमुळे भारताने आपल्या सीमा सील केल्या आहेत, ज्यामुळे बांगलादेशला होत असलेली शेतमालाची निर्यात थांबली आहे.

भारताकडून बांगलादेश जवळपास 75 टक्के शेतमाल आयात करतो. विशेषतः नाशिकमधून दररोज 70 ते 80 ट्रक कांदा बांगलादेशला रवाना होतात. सध्याच्या स्थितीत, नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेश सीमेवर थांबले आहेत. या परिस्थितीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

निर्यातीच्या थांबण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे दोन्ही देशांमधील व्यापारावर गंभीर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.