बांदा - दोडामार्ग मार्गावर २ एसटी बसमध्ये भीषण अपघात, २२ प्रवासी जखमी

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा - दोडामार्ग मार्गावर आज सकाळी दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक झाली. ही दुर्घटना पानवळ गावाजवळ घडली असून, दोन्ही बसमधील एकूण २२ प्रवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने सर्व प्रवासी आता सुरक्षित असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सावंतवाडी तालुक्यातील फुकेरी येथून बांद्याच्या दिशेने निघालेली बस आणि समोरून येणारी उस्मानाबाद - पणजी बस पानवळ येथे एकमेकांवर धडकल्या. दोन्ही बस भरधाव वेगात असल्याने जोरदार अपघात झाला. अपघातावेळी चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, मात्र फुकेरी बस जवळपास 100 फूट फरफटत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
फुकेरी बसमध्ये काही कॉलेजचे विद्यार्थी प्रवास करत होते, त्यांना किरकोळ दुखापती झाल्या. सर्व जखमींना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर काही वेळ परिसरात वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश –
- मोहन बाळू गवस
- अनिल अनंत कदम (वय 48)
- बाळासाहेब गणपत कुंभार (वय 99)
- अर्चना अर्जुन हिंगणेकर (वय 50)
- ज्ञानेश्वर श्रानू गवस (वय 60)
- पुनाजी खेमा आईर (वय 25)
- इंदुमती व सुरेखा भरत आईर (वय 50)
- प्रकाश शांताराम राऊत (वय 60)
- रेश्मा व रमेश वासुदेव आईर
- रामचंद्र राकजी गवस (वय 72)
- भक्ती विजय देसाई
- तृप्ती, माधुरी व रमेश देसाई
- यशवंत लडमन आदर (वय 75, रा. फुकेरी)
- विमल विद्याधर घोगळे (वय 53)
- लक्ष्मी बाळासाहेब कुंभार (वय 60)
- उर्मिला श्रीमंत कुंभार
- २ कॉलेज विद्यार्थी
बांदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व जखमींवर प्राथमिक उपचार सुरू असून, अधिक तपास सुरू आहे.