बोंद्रेनगरातील ७७ जणांच्या घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे : सतेज पाटील यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर प्रतिनिधी: महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी पाहणी केली. सर्व लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यातील जी कामे अपूर्ण आहेत ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
फुलेवाडीमधील महिपतराव बोंद्रेनगर येथील महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेची महानगरपालिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण ७७ घरे बांधण्यात आली आहेत. या घरांचे मागील तीन वर्षापासून काम सुरु होते, ते पूर्ण झाले आहे. यासाठी आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सात्यत्याने पुढाकार घेऊन या ७७ कुटुंबांचे घरांचे स्वप्न पूर्ण केले. यासाठी लागणाऱ्या कर्जासाठीही आमदार पाटील यांनी सर्वांना मदत केली होती. या घरांची त्यांनी पाहणी करून सर्व लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी लाईट मीटर, नळ कनेक्शन अशा काही अपूर्ण कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्याशी संवाद साधत तात्काळ कामे मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या कामासाठी शेल्टर असोसिएशनच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी, ऋतुजा भराटे, मेघा लोंढे, महादेव कांबळे, मनोज्ञा कुलकर्णी आदींची सुद्धा मदत झाली. तर कम्युनिटी हॉलसाठी शिरीष बेरी यांनी मदत केली.
यावेळी माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, धनंजय भोंगळे, अभिजित देठे, प्रकाश भोपळे, प्रकाश शिंदे, बाबुराव बोडके, ठेकेदार राजेंद्र दिवसे, कै. महिपतराव बोंद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष अशोक देगावे, सचिव भिकाजी वायदंडे,राणी खंडागळे सचिन शिंदे, संभाजी भोरे, भीमराव आवळे, सुरेश भोरे, संजय गोसावी, शिवाजी मोरे, सीताबाई पोवार, हिंदुराव गडकर, बबन गोसावी यांच्यासह सर्व लाभार्थी उपस्थित होते.