व्हिनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन

व्हिनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात श्रीमद् भागवत कथेचे आयोजन
लक्ष्मी नारायण मंदिरातर्फे भागवत सप्ताह

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र प्रतिनिधी

शहरातील व्हिनस कॉर्नर येथील लक्ष्मी नारायण मंदिरात आज (दि. 1 ऑगस्ट) पासून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात ध्वजारोहणाने करण्यात आली.

अधिक श्रावण महिन्याच्या निमित्ताने व्हिनस कॉर्नर येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर ट्रस्टच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट दरम्यान श्रीमद् भागवत कथा सप्ताहाची सुरुवात झाली. त्यामध्ये पहिले पुष्प वाहताना मयूर कुलकर्णी यांनी देव, देश आणि धर्म यासाठी झटणे हीच ईश्वरसेवा असल्याचे सांगत रसाळ आणि ओघवत्या वाणीत धर्माचे मूळ तत्वज्ञान आणि भागवताची सुरवात, गोकर्ण उपाख्यान, देव म्हणजे काय आणि अनेक संकल्पनांचे उदाहरणाच्या माध्यमातून शंकांचे निरसन केले. त्यामध्ये भक्तगण तल्लीन होऊन गेले. 

दरम्यान, सकाळी ९.३० वाजता देवता स्थापन, ध्वजारोहण, तुळशी पूजन, गोपूजा, दुपारी १.३० वाजता वाद्यांच्यासह राधाकृष्ण मंदिर येथून भागवत यात्रा काढण्यात आली. सायंकाळी ७.३० वाजता आरती झाली. उद्या याचे निरुपण होईल. 

राजस्थानी महिला मंडळ आणि लक्ष्मी नारायण युवा मंचचे यासाठी सहकार्य लाभले आहे. १९ वर्षांनी आलेल्या श्रावण मासानिमित्त आयोजित भागवत कथेच्या श्रवणाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्रीनिवास मालू यांनी केले. 

यावेळी उपाध्यक्ष मनीष झंवर, सचिव राजेंद्र शर्मा, सदस्य संजय दायमा, योगेश मोदी व पुजारी विष्णुदास दायमा यांच्यासह मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते.