भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी .. ; अरूंधती महाडिक

भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी .. ; अरूंधती महाडिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) - स्वराज्य निर्माते छत्रपती शिवरायांच्या आदर्शानुसार पोलिस दलाचे कार्य सुरू असून, महिलांचा आत्मसन्मान, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस दल पार पाडत आहेत, असा विश्वास अप्पर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांनी दिला. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, भागीरथी महिला संस्था, रोटरी क्लब ऑफ गार्गीज आणि जितो कोल्हापूर चॅप्टर या संस्थांच्यावतीने महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. तर, भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करण्याची जबाबदारी पेलली आहे. याच पध्दतीने विविध संस्थांनी महिला संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अरूंधती महाडिक यांनी केले.

धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, गेल्या १८ वर्षापासून महिला सक्षमीकरणाचे काम केले जाते. रोजगारविषयक विविध उपक्रम राबवत, संस्थेने ३८ हजार महिलांना स्वावलंबी बनवले आहे. अलिकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांवर वाढ होत असल्याने, तसेच सायबर फ्रॉडची संख्या वाढू लागल्याने, याबाबत जनजागृती आणि महिलांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने शाहू स्मारक भवन मध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक कायदेविषयक मार्गदर्शन उपक्रम पार पडला. 

श्रृती पुंगावकर यांच्या सेल्फ डिफेन्स अ‍ॅकॅडमीतील खेळाडूंनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. अप्पर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू, पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वाती यादव, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक, मंजीरी महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा अरूंधती महाडिक आणि पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 

अरूंधती महाडिक पुढे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. पोलिस दलाकडून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवले जाते. मात्र अशा घटनात महिलांचे प्रबोधन आणि त्यांच्या संरंक्षणाच्या जबाबदारीसाठी स्वतः सह विविध व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

सोशल मीडियाद्वारे नागरिकांची मोठया प्रमाणात फसवणूक होत आहे. समाजातील काही अपप्रवृत्तीद्वारे महिलांवर विविध माध्यमातून अत्याचार होत आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस दल २४ तास कटीबध्द आहे. फसवणूकीपासून सावध रहा, महिला अत्याचार किंवा देश विघातक घटना नजरेस आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांनी केले. 

महिलांनी आपला छळ किंवा अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांच्या हेल्पलाईनशी संपर्क साधा, जवळच्या पोलिस ठाण्यात जावून तात्काळ मदत घ्या, असे आवाहन पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी केले. तर ऑनलाईन फ्रॉड, तंत्रज्ञानाद्वारे फसवणूक, अन्याय, अत्याचार टाळण्यासाठी पोलिसांच्या विविध विभागांच्या हेल्पलाईन, मोबाईल नंबरवर संपर्क साधा. पोलिस दल महिलांच्या सदैव पाठीशी आहे, असा विश्वास पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी दिला आहे. 

यावेळी रोटरीचे बी.एस. शिंंपुकडे, वन स्टॉप सखी केंद्राच्या निलम धनवडे, सेल्फ डिफेन्स प्रशिक्षक श्रृती पुंगावकर, योगिनी कुलकर्णी, माया राठोड, स्वीटी पोरवाल, महेश्वरी गोखले यांचा सन्मान करण्यात आला.