म्हैस विक्री केंद्रामध्ये जातिवंत, दुधाळ व निरोगी म्हैशी उपलब्ध- अरुण डोंगळे

म्हैस विक्री केंद्रामध्ये जातिवंत, दुधाळ व निरोगी म्हैशी उपलब्ध- अरुण डोंगळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन व दूध उत्पादकास म्हैस प्रदान कार्यक्रम गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व सर्व संचालक मंडळ, एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी, प्राथमिक दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी यांच्‍या उपस्थितीत केर्ली ता. करवीर येथे संपन्‍न झाला.

          याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून नेहमीच दूध उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळमार्फत सातत्याने दूध उत्पादकांना किफायतशीर दूध व्यवसाय करण्यासाठी विविध सेवा सुविधा पुरवल्या जातात. एन.डी.डी.बी व गोकुळ यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी संघ नियमानुसार आपल्या पसंतीनुसार स्व:जबाबदारीने दुधाची खात्री करूनच या केंद्रातून म्हैशी खरेदी कराव्यात व उत्तम व्यवस्थापनाद्वारे त्यांचे संगोपन करावे असे आवाहन केले. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळमार्फत ३० हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ देण्याचे यावेळी जाहीर केले. तसेच भविष्यात या जातिवंत म्हैस विक्री केंद्राला दूध उत्पादकांनाच्याकडून मिळणारा प्रतिसाद पाहून दूध उत्‍पादन वाढीस चालना मिळण्यासाठी जिल्ह्यातील भौगोलिक स्थितीचा विचार करून इतर ठिकाणी हि अशी जातिवंत म्हैस विक्री केंद्रे सुरु करण्यात येतील असे सांगितले.

          यावेळी संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघ व एन.डी.डी.बी. यांच्या संयुक्त विद्यमाने उभा केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना परराज्यातील जनावरे खरेदीसाठी येणाऱ्या अडीअडचणी कमी होणार असून खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे तरी याचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा असे सांगितले.

          या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक राणी कोंडीराम पोवार, प्रतिमा दूध संस्था – निटवडे, बाबासो केरबा दिवसे, नागनाथ दूध संस्था- नागदेववाडी, बळीराम पांडुरंग साळोखे, पंचगंगा दूध संस्था – आंबेवाडी, नवनाथ केरबा गुडाळे, जखनाई दूध संस्था - राशिवडे बु।।, हरीश भिकाजी दळवी, धरमीमाई दूध संस्था गवसे पैकी पाटीलवाडी, बाबू व्यंकू कागणकर, विठ्ठल दूध संस्था – तावरेवाडी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.   

          यावेळी स्‍वागत प्रास्ताविक संचालक बाबासाहेब चौगले व यांनी केले. तर एन.डी.डी.बी. मुंबई चे जनरल मॅनेजर डॉ. शिवकुमार पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले.

          यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील,संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.शिवकुमार पाटील, डॉ.मोहम्मद तारिक, डॉ.उदयकुमार मोगले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंखे, संघाचे अधिकारी, पंचक्रोशीत दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.