राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अमृतस्नानावर संजय राऊत यांचा निशाणा , म्हणाले...
![राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अमृतस्नानावर संजय राऊत यांचा निशाणा , म्हणाले...](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67ab05cfbad4c.jpg)
मुंबई : उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. मागील महिन्यापासून हा मेळा सुरु असून जगभरातून लोक या महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील गंगेमध्ये स्नान केले आहे. मात्र मुर्मू यांच्या अमृतस्नानामुळे महाकुंभमेळा रोखण्यात आला होता असा गंभीर आरोप केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हीआयपी अमृतस्नानावरुन योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या त्रिवेणी संगमावरील अमृतस्नानावर आक्षेप घेत यामुळे चार कोटी भाविकांना संगमावर जाऊ दिले नाही, असा आरोप केला आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “महाकुंभात स्नान करण्यासाठी राष्ट्रपती मुर्मू आल्यानंतर कुंभमेळा इतरांसाठी थांबवण्यात आला.
कोट्यवधी लोकांना रोड अॅरेस्ट करण्यासारखा प्रकार घडला आहे. त्यांना एक इंच पुढे जावू दिले नाही. सोमवारी राष्ट्रपतींच्या स्नानामुळे 12 तास महाकुंभमेळा रोखून धरला होता. त्रिवेणी संगमावर कोणाला जावू दिले नाही. तीन ते चार कोटी लोक तेथे होते,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.