राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल, महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल, महायुती आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "शंखनाद" अशा एका शब्दाने एक्स पोस्ट केली. त्यांनी निवडणुकीचे शंखनाद झाले असल्याचे सांगितले. महायुती सरकारनेही आज पत्रकार परिषद घेऊन गेल्या सव्वा दोन वर्षांतील कामांचा अहवाल मांडला.

फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत राज्यातील प्रगतीची आकडेवारी मांडत, विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "स्थगिती सरकार गेल्यानंतर वेगाने काम करणारे सरकार आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अनेक योजना आणल्या आहेत."

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत, "विरोधक निवडणुकीपूर्वी खोटे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु निवडणूक आयोग स्वायत्त असून त्यानेच हा कार्यक्रम जाहीर केला आहे," असे सांगितले. त्यांनी महायुतीच्या योजनांचा बचाव करत, "लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे, सर्व घटकांतील महिलांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत," असेही स्पष्ट केले.