सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवा - प्रशासक के.मंजूलक्ष्मी

कोल्हापूर (प्रतिनिधी) - शहरातील सर्व निवारा केंद्रे सज्ज ठेवा. सर्व प्रभाग क्षेत्रीय अधिकारी व उप - शहर अभियंता यांनी फिरती करुन निवारा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिल्या. पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी महापालिकेने केलेल्या नियोजनाचा आढाव प्रशासकांनी घेतला. सदरची बैठक आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी सर्व विभागांनी येणा-या संभाव्य आपत्तीसाठी सज्ज राहावे. पूर परिस्थितीतील नागरिकांना स्थलांतरित करण्यात येणा-या निवारा केंद्रांच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्या. शहरामध्ये जेथे जेथे खड्डे पडलेले आहेत तेथे मुरमाद्वारे पॅचवर्क करण्याच्या सूचना सर्व उप - शहर अभियंता यांना दिल्या. निवारा केंद्रामध्ये दयावयाच्या चहा, नाष्टा व जेवणाचे बचत गटामार्फत नियोजन करावे. नाले सफाईमधून आज अखेर 50 हजार टनापेक्षा जास्त गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे शहरात कोठेही नाले परिसरामध्ये नागरी वस्तीत पाणी शिरलेले नाही. याबद्दल आरोग्य विभागाचे अभिनंदन के. मंजूलक्ष्मी यांनी केले.
शहरातील धोकादायक इमारती व होर्डींग्ज उतरवून घ्या. आपत्तीच्या काळात पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी काळम्मावाडी योजनेचे चोख नियोजन करा. पहिल्यांदा पाणी येणा-या भागामध्ये नागरीकांना सर्तक राहण्याच्या सूचना वेळोवेळी अग्निशमन विभागाने द्याव्यात. स्थलांतरीत होणा-या नागरीकांची दैनंदिन नोंदणी अपडेट ठेवावी. पूराच्या कार्यक्षेत्रात येणा-या हॉस्पीटलला इशारा पातळी गाठताच स्थलांतरीत होण्याबाबत लेखी पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्याधिका-यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप - आयुक्त पंडित पाटील, कपिल जगताप, प्रितोष कनकल, सहा. आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, सहा.विद्युत अभियंता नारायण पुजारी आदी उपस्थित हेाते.