सिद्धरामय्या कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद सोडणार?'या' स्वामींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेना उधाण
बेंगळूर : चंद्रशेखर स्वामीजी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आवाहन केले की त्यांनी मुख्यमंत्रीपद डी. के. शिवकुमार यांना द्यावे. ते म्हणाले की, "सर्वजण मुख्यमंत्री झाले आहेत, पण डी. के. शिवकुमार यांना अजून संधी मिळालेली नाही. त्यामुळे सिद्धरामय्या यांनी त्याग करावा आणि शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्यावे."ही मागणी त्यांनी नाडप्रभू केम्पेगौडा यांच्या ५१५ व्या जयंती कार्यक्रमात केली, जो नाडप्रभू केम्पेगौडा हेरिटेज साईट डेव्हलपमेंट अॅथॉरिटी, बीबीएमपी आणि कन्नड आणि संस्कृती विभागातर्फे शहरातील कंठिरवा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे दोघेही उपस्थित होते.
स्वामीजी म्हणाले, "सिद्धरामय्या यांनी मन मोठे केल्यास हे शक्य आहे. सर्वांनी मुख्यमंत्री म्हणून सत्ता उपभोगली आहे, पण आमचे शिवकुमार झाले नाहीत. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून खूप अनुभव आहे. त्यांनी आता पद सोडून शिवकुमार यांचे कल्याण करावे. हे केवळ सिद्धरामय्याच करू शकतात. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची विनंती करत आहे.
"स्वामीजींच्या आवाहनानंतर पत्रकारांजवळ प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, "मुख्यमंत्री बदलण्याचा अधिकार हा पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या सूचनेनुसार आम्ही कार्य करतो".