केआयटी ला महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५ कोटीचा निधी मंजूर

केआयटी ला महाराष्ट्र राज्य शासनाकडून ५ कोटीचा निधी मंजूर

कोल्हापूर(प्रतिनिधि) : केआयटीने गेल्या वर्षभरामध्ये जवळपास १० स्टार्टप्सना एकूण ५० लाखापर्यन्ताचा ‘इग्निशन फंड’ दिलेला आहे. तसेच १६ स्टार्टअप च्या कल्पना या कंपनीकडे नोंदणीकृत झालेल्या आहेत.केआयटीच्या वतीने ८ पेटंट फाईल झालेले असून जवळपास १५ हून अधिक विशेष कार्यशाळा या नवोद्योजकांसाठी व नवसंशोधकांसाठी केआयटीने आयोजित केलेल्या आहेत. याची दखल म्हणून या केआयटीला महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (MSInS), महाराष्ट्र सरकारने इनक्यूबेटर सहकार्य निधी म्हणून ५ कोटी मंजूर केले आहेत अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली.

      महाराष्ट्र सरकारच्या सहभागाने व पुढाकाराने राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्टार्ट-अपना सक्षम करणे तसेच स्टार्ट-अप इकोसिस्टमच्या विकासाला चालना देण्यासाठी मजबूत पायाभूत सुविधा विकसित करणे या हेतूने‘महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी’ ची स्थापना झाली आहे. 

केआयटी कॉलेज विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहित करत असते. राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून नवउद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी केआयटी ने स्वतः पुढाकार घेतलेला आहे.अशा स्टार्टप्सच्या माध्यमातून केआयटीच्या नियमित विद्यार्थ्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती होत असते. असे डॉ.मोहन वनरोट्टी यांनी सांगितले.

   यावेळी केआयटी आय.आर.एफ.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर आरळी, इंक्युबेशन मॅनेजर देवेंद्र पाठक, इंक्युबेशन असोसिएट पार्थ हजारे व अंजोरी कुंभोजे यांनी या सर्व प्रक्रियेसाठी मोलाचे तांत्रिक सहकार्य केले. संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन व सहकार्य मिळाले.