ॲड .उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड ; कोल्हापुरात देसाई कुटुंबात आनंदोत्सव

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिद्द जिवंत असेल आणि जिज्ञासा जागी असेल तर माणसाला स्वतःचे जग निर्माण करता येत. ज्यांना काळाबरोबर धावता येत त्यांचा जीवनाचा प्रवास यशस्वी होत असतो. कायद्याच्या ज्ञानातून असाच आपल्या जीवनाचा प्रवास यशस्वी करणारे सुप्रसिद्ध कायदे तज्ञ विशेष सरकारी वकील पद्मश्री ॲड.उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाली. त्यांच्या निवडीची बातमी समजताच कोल्हापुरातील त्यांच्या आजोळी देसाई कुटुंबीयात आनंदोत्सव साजरा झाला.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मंगरूळ हे त्यांचे जन्मगाव.वडील बॅरिस्टर देवराज माधवराव निकम हे 1962 ते 1967 या काळात आमदार होते. न्यायाधीश व बॅरिस्टरपदी त्यांनी चांगले कार्य केले होते.
आई विमलादेवी या कोल्हापूर मधील शिक्षण महर्षी, संस्कृत पंडित व प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या भगिनी, आई बरोबर त्या नेहमी आजोळी कोल्हापूरला येत असत. माजी महापौर सुभाष राणे यांच्या पत्नी मीनाताई या उज्वल निकम यांच्या सख्ख्या भगिनी. कोल्हापुरातील बालपणीच्या आठवणी त्या नेहमी सांगतात.
न्यू शाहूपुरी मधील माजी आमदार दिलीपराव देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांचे ते आते भाऊ असल्यामुळे लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांच्यातील स्नेह त्यांनी जपला आहे.
ॲड.उज्वल निकम यांच्या राज्यसभा सदस्य निवडीनंतर, कोल्हापुर येथील न्यू शाहूपुरीतील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. जयकुमार देसाई, शिवानी देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, युवा नेते दौलत देसाई, पृथ्वी मोरे यांच्यासह सर्व देसाई परिवार व नातेवाईक उपस्थित होते.