.... अखेर समरजित घाटगेंचा भाजपला रामराम

.... अखेर समरजित घाटगेंचा भाजपला रामराम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जवळ येईल तसतशा न राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान, कागल मधील भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करायचं निश्चित झालं असून, याबाबत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती समोर येतीय. 

कागल तालुक्याच्या राजकारणात माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे, ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे, माजी खासदार संजय मंडलिक आणि समरजित घाटगे यांच्यामधील लढती सर्वश्रुत आहेत. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून ना. हसन मुश्रीफ यांचं नाव निश्चित झालंय. त्यामुळं सध्या भाजपमध्ये असलेले समरजीत घाटगे यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी लढावं लागेल. काही दिवसांपासुन समरजीत घाटगे हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं होतं. पण मंगळवारी त्यांनी शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरुय. येत्या 3 सप्टेंबर रोजी शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यावेळी कागलच्या गैबी चौकात जाहीर सभा घेऊन समरजीत घाटगे हातात तुतारी घेणार असल्याचं समजतंय.