शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार-खा.शरद पवार

शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार-खा.शरद पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) :शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांची तीव्रतेने मागणी आहे.याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे.त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हा महामार्ग रद्द करण्याबाबत सविस्तर चर्चा करू.अशी ग्वाही खासदार शरद पवार यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळास दिली.

 हॉटेल पंचशील येथे या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.

 पवार पुढे म्हणाले,शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. हा महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी भेटत आहेत.याचा मी थोडाफार अभ्यास केला आहे. या महामार्गाची आवश्यकता नाही. त्यापेक्षा आहे ते रस्ते उत्तम करूया.

शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांना भूमीहीन करणारा महामार्ग रद्द करण्यासाठी पवारसाहेब यांनी पुढाकार घ्यावा. अशी शेतकऱ्यांच्यावतीने विनंती केली. यापुढेही याबाबत आवश्यक तो पाठपुरावा करून महामार्ग रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

  समितीचे समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले,या महामार्गाची शेतकऱ्यां शासनाकडे मागणी केली नसताना तो लादत आहेत.शेतकऱ्यांच्या विरोधानंतर एकीकडे शासन हा महामार्ग रद्द केल्याची माहिती माध्यमांमधून देत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना अंधारात ठेवून प्रकल्प रेटत आहे. या महामार्गाच्या फेररचना व स्थगितीपेक्षा तो रद्द करणे हेच आमचे ध्येय आहे.

*साकडे पवार यांना*

 या महामार्गामध्ये बाधित असलेल्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आंदोलनाची मोट बांधून धार वाढवण्याच्या दृष्टीने राज्यव्यपी परिषद महिनाभरात कोल्हापुरात घेण्याचे नियोजन आहे.या परिषदेचे राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात येणार आहे. गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणात अनुभवी नेतृत्व म्हणून अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पवार यांनी पुढाकार घेतलेला आहे. त्या पद्धतीने या प्रश्नातही त्यांनी लक्ष घालावे. या परिषदेस मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची सोयीची वेळ द्यावी.असे साकडे समितीच्या वतीने पवार यांना घातले. 

यावेळी शिवाजी मगदूम,दादासो पाटील, सुरेश संकपाळ,कृष्णात पाटील,शिवाजी कांबळे, प्रकाश पाटील,आनंदा पाटील, सुधाकर पाटील,साताप्पा लोंढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.