ईव्हीएम विरोधात जानकरांचा मोठा निर्णय

सोलापूर प्रतिनिधी : जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवत आपली आमदारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मते, ईव्हीएमच्या गैरवापरामुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला असून मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.
ईव्हीएमच्या विरोधात उचलले पाऊल
मारकडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचा आरोप करत गावात मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्याने पोलिसांनी गावकऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला. या घटनेमुळे गाव देशभर चर्चेत आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची बॅलेट यात्रा मारकडवाडीतून सुरू होण्याची शक्यता आहे.
जानकरांचा राजीनामा देण्याचा निर्णय
विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनादरम्यान उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, "ईव्हीएमच्या विरोधासाठी बलिदान आवश्यक आहे. मतपत्रिकेवर मतदान घेण्याची निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवेन."
ईव्हीएमवर गंभीर आरोप
जानकरांनी ईव्हीएमद्वारे निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत सांगितले की, “माझ्या मतदारसंघात जवळपास लाखभर मते वळवण्यात आली आहेत. माझ्या विजयानंतरही लोकांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. लोकशाहीत लोकांना त्यांचा प्रयोग करण्याची संधी दिली गेली पाहिजे.” असे ही ते म्हणाले आहेत.