एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय, पण का ?

एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद हवंय, पण का ?

मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण याबदल्यात ते भाजपशी उत्तम डील करण्याच्या प्रयत्नात आहेत. एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदावर दावा करत त्या खात्याचा आग्रह धरला आहे. पण पोलीस दलावर कमांड असणारे हे पद प्रत्येकालाच का हवे असते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे शिंदेंनी या पदाचा आग्रह धरल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाल्यावर शिंदे गृहमंत्री होण्यासाठी उत्सुक होते. परंतु सत्तावाटपाच्या करारात गृह खाते राष्ट्रवादीकडे गेले आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे आले, ते शिंदे यांना मिळाले.जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा त्याच खात्यासाठी इच्छुक होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानल्यानंतर शिंदेंना ते भाजपकडे द्यावे लागले. आता भाजपला मुख्यमंत्रिपद द्यावे लागल्याने शिंदेंनी पुन्हा गृह खात्यावर दावा केला आहे.

गृह विभागाला  इतके महत्व का ?  

गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळात कुठले महत्वाचे पद असेल तर ते गृहमंत्रीपद आहे. गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्यानंतर  दुसऱ्या क्रमांकाचा  सर्वात प्रभावी सदस्य म्हणून पाहिल जातं. याशिवाय, राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी सामना करताना पोलिस दलावर थेट नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरते. पण यात एक ट्विस्टही आहे, मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्यास, ते गृह खात्यावर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवू शकतात. कारण सर्व प्रमुख निर्णयांना त्यांच्या परवानगीची आवश्यकता असते. उच्चपदस्थ पोलीस अधिकारी आणि गृह विभागाचे पदाधिकारी महत्त्वाच्या बाबींवर मुख्यमंत्र्यांनाच अहवाल देतात.