कणेरीवाडीत काम न करताच केली ३५ लाखांची उचल ..!

कणेरीवाडीत काम न करताच केली ३५ लाखांची उचल ..!

कोल्हापूर - कणेरीवाडीतील करवीर इथं ३५ लाख रुपयांची कामे न करताच  पैश्यांची उचल केली असल्याची घटना घडली तरीही जिल्हा परिषद कारवाईसाठी अजूनही कोणता मुहूर्त बघत आहे, असा सवाल आरपीआयच्या आठवले गटाने उपस्थित केला आहे. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. जर आठ दिवसांत संबंधित शासकीय अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आणि ठेकेदारांवर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. 

कणेरीवाडी येथे २०१७ ते २०२२ या सालातील १४ व्या वित्त आयोगातून आणि दलित वस्ती सुधार योजनेतून ही कामे करण्यात आली आहेत. ही एकूण सहा कामे असून या कामांबाबत पांडुरंग शंकर खोत यांच्यासह अन्य दोघांनी ३ जुलै २०२३ रोजी तक्रार केली होती.  त्यानुसार ग्रामपंचायत, सामान्य प्रशासन आणि बांधकाम अशा तीन विभागांच्या कात्रीतून एकदा या प्रकरणाची चौकशी सुरू झाली.

बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता सदाशिव येजरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी चौकशी करून वस्तुनिष्ठ अहवाल कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला. परंतु, त्यानंतर ठोस अशी कोणतीच कारवाई अजूनही झालेली नाही. याबाबत दोन ग्रामसेवक आणि करवीर पंचायत समितीचे शाखा अभियंता एस. बी. गायकवाड हे सकृतदर्शनी दोषी ठरले असून, त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कणेरीवाडीत आण्णाभाऊ साठेनगर, बौद्ध वस्ती, बौद्ध वस्ती महालक्ष्मीनगर, रोहिदास नगर या ठिकाणी हे रस्ते केल्याचे कागदोपत्री दाखवून ३५ लाख रुपये उचलण्यात आले आहेत. मात्र, ही नगरेच कणेरीवाडीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. करवीर पंचायत समितीच्या एमबीमध्ये ठिकाणांचा जाणीवपूर्वक उल्लेखच केलेला नाही, असा घोळ घालून हे पैसे उचलण्यासाठी करवीर पंचायत समिती, आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले असल्याची माहिती समोर आली आहे.