काँग्रेसच्या त्या सात जणांवर संजय राऊतांचा मोठा आरोप!
मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसच्या ७ फुटीर मतांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “काँग्रेसची ७ मतं फुटली हे स्वत: नाना पटोलेंनी मान्य केलं आहे. पण ७ मतं फुटली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
मागच्या विधानपरिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंचा पराभव करणारे हेच ७ लोक होते. दोन वर्षांपूर्वी चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. तेव्हाही या ७ लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं होतं. काँग्रेसची ही ७ मतं गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसबरोबर नाहीत. ती फक्त कागदावर सोबत आहेत. ते नावानिशी समोर आले आहेत. तेच हे ७ लोक आहेत.”राऊत पुढे म्हणाले, “काँग्रेसच्या या सात जणांना सोबत घेऊन कालचा जो खेळ केला, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र जिंकला असं काही होत नाही. लहान पक्ष, अपक्ष सरकारबरोबर राहात असतात. काल तर आमदारांचा भाव तुम्ही पाहायला हवा होता. शेअर बाजाराप्रमाणे आमदारांचा भाव चढत होता. तो भाव २० ते २५ कोटींच्या घरात होता. शिवाय नुसता भाव नाही, काही आमदारांना दोन एकर जमीनही दिली.”राऊत यांनी केलेले हे आरोप राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे आहेत. या आरोपांमुळे विधानपरिषद निवडणुकीतील राजकीय खेळांचा पर्दाफाश झाला आहे.