कागलला पिलरच्या ऊड्डाणपुलासह भुयारी मार्ग, गटारींचे बांधकाम, स्ट्रीटलाईट बसवा - राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची मागणी

कागल प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये कागल शहरालगत पिलरच्या उड्डाणपुलाची लांबी वाढविण्यासह भुयारी मार्ग, सांडपाणी विल्हेवाटीसाठी गटारीचे बांधकाम व स्ट्रीट लाईट बसवा, अशा मागण्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केल्या. तसेच; यापूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्यानुसार मंजूर केलेल्या एका उड्डाणपुलाबद्दल शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभारही मानले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या शिष्टमंडळामध्ये केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक संजय ठाणेकर, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, नगरसेवक सौरभ पाटील, संग्राम लाड यांचा समावेश होता. दरम्यान; सकाळीच या विषयासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही मुंबईतून दूरध्वनीवरून चर्चा केली.
यावेळी शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनातील मागणी अशा........
१) शाहू उद्यानकडून हायवे क्रॉस होऊन गजबर पाणंद रस्ता पिंपळगाव, सिध्दनेर्ली, नदीकिनारा, बानगे कडे जाणारा ग्रामीण मार्ग असलेने त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. सध्या त्याठिकाणी रोड क्रॉस अथवा भुयारी मार्ग प्रस्तावित केलेचे दिसुन येत नाही. तरी चेनेज ५९४.०३० दरम्यान मोठा भुयारी मार्ग होणे आवश्यक आहे. हा भुयारी मार्ग कागल शहरास व पश्चिमेकडील ७०-८० गावांना जोडणारा रस्ता तयार होणार आहे. तसेच; कर्नाटक राज्यातुन हायवेवरून शहरात येण्यासाठी या भुयारी मार्गाचा वापर होणार आहे. शहराचे ड्रेनेज भुयारी मार्गातून पश्चिमेस गजबर ओढयांस जोडता येणार आहे.
२) कोर्ट बिल्डींग ते स्टॅन्डपर्यंत प्रस्तावित केलेला उड्डाणपूल दक्षिणेस स्टॅण्डजवळील बोगद्यापर्यत प्रस्तावित करुन सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल करताना माननीय नाम. हसनसो मुश्रीफ, मंत्री, वैद्यकीय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई, कागल नगरपरिषद व कृती समिती यांचे समोर सादरीकरण करून अंतिम करणे आवश्यक आहे.
३) अतिवृष्टी कालावधील भुयारी मार्गात पाणी साचून वाहतूक बंद होत असलेने या पाण्याचा निचरा पूर्वेकडील/पश्चिमेकडील ओढयापर्यंत स्लोपप्रमाणे चॅनेल बांधून होणे आवश्यक आहे.
४) नगरपरिषद हद्दीत सर्व्हीस रोडचे शहरांकडील बाजुस गटर बांधकाम होऊन अस्तित्वातील पाणंद रस्तेस स्लोप विचारांत घेऊन ड्रेनेजचा निचरा ओढयांकडेच होईल, अशी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
५) नगरपरिषद हद्दीत हायवेवरती स्ट्रीट लाईटची व्यवस्था होणे आवश्यक आहे.
वरील सर्व मुद्दे कागल शहराच्या व तालुक्याच्यादृष्टीने तांत्रिकदृष्ट्या महत्वाचे असुन ते आता विचारात न घेतलेस भविष्यात वाहतुकीचा मोठा पेचप्रसंग निर्माण होऊन सार्वजनिक हिताच्या नुकसानीसह धोकादायक परिस्थिती उद्भवणार आहे. म्हणून; आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात केली आहे.
दरम्यान; या शिष्टमंडळाने कागल- निपाणी राष्ट्रीय महामार्गावर दूधगंगा नदीवरील पुलाच्या संथ गतीच्या बांधकामाबद्दल मंत्री गडकरी यांच्या निदर्शनाला आणून दिले. नदी परिसरातील पुलाची ही जमीन जरी महाराष्ट्राच्या हद्दीत असली तरी कर्नाटक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काम करीत असल्याचे यावेळी गडकरी यांना सांगितले. या पुलाचे काम जलदगतीने करण्याच्या सूचनाही मंत्री गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या शिष्टमंडळात केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नगरसेवक संजय ठाणेकर, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, नगरसेवक सौरभ पाटील, संग्राम लाड आदी उपस्थित होते.