समरजितसिंह घाटगेंच्या पक्षप्रवेशाआधीच कार्यकर्त्यांमध्ये तुतारीचा उत्साह

समरजितसिंह घाटगेंच्या पक्षप्रवेशाआधीच कार्यकर्त्यांमध्ये तुतारीचा उत्साह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील भाजप नेते आणि माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी भाजपला अधिकृत रामराम केला आहे. त्यांनी गुरुवार दि. २१ ऑगस्ट रोजी सोशल मीडियातून अधिकृत घोषणा करताना शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. तर गेल्या  23 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कागल मध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी त्यांना ,राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात प्रवेश करावा व तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली होती. तर येत्या 3 सप्टेंबर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये समरजित सिंह घाटगे यांनी पक्षप्रवेश करणार आहेत.  त्यामुळे पक्षप्रवेशा आधीच कार्यकर्त्यांमध्ये तुतारीचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. 

 कागलमधील विवेक कुलकर्णी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तुतारी चिन्हाचे लोगो तयार केले आहेत, व ते मोबाईलवर चिकटवून आत्तापासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे समरजितसिंह घाटगे  यांच्या कापशी खोऱ्यातील कासारी या गावांमध्ये दलित समाजातील बुद्ध विहारामध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमातच या तुतारी चिन्हाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले व घाटगे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर हे तुतारी असलेला लोगो चिकटवण्यात आला. कागल विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर आता हा लोगो लागला आहे. त्यामुळे कागल मतदार संघात घाटगे  यांनी जनसंपर्कसह प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. तुतारी चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी हौशी कार्यकर्त्यांच्या या संकल्पनेमुळे त्यांना चांगलाच फायदा होईल.