कुस्ती निवड चाचणीस उपस्थित राहा - विद्या शिरस

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर अंतर्गत केंद्र शासनामार्फत खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्राकरिता कुस्तीच्या खेळाडुंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणी 2 जुलै रोजी होणार असून यासाठी जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग असणाऱ्या खेळाडूंना निवड चाचणीमधे भाग घेता येणार आहे. प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशाकरिता कुस्ती खेळाची मुले (06) व मुली (06) खेळाडूंची निवड चाचणी घेण्यात येणार आहे. चाचणीस जास्तीत जास्त खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत केंद्र शासनामार्फत खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर सन 2021 पासून छत्रपती शिवाजी स्टेडीयम मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे सुरु आहे. 2 जुलै रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे चाचणी होणार असून यामध्ये 10 ते 16 वर्षे वयोगटातील कुस्ती खेळाडू (मुले व मुली) सहभागी होवू शकतात.
चाचणीसाठी जन्म दाखला, आधार कार्ड व क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र आवश्यक आहे. निवड चाचणी संदर्भात अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत मानतेश पाटील यांच्याशी संर्पक साधावा असेही शिरस यांनी सांगितले.