केर्ली येथील विद्यार्थ्यांचा शाळेच गेट अंगावर पडून मृत्यू
कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील कन्या कुमार विद्यामंदिर, केर्ले येथे एक दुर्दैवी घटना घडली.
कन्या कुमार विद्यामंदिर केर्ले इथं शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून सहावीतील विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. स्वरूप दिपकराज माने (वय १३, रा. केर्ले पैकी मानेवाडी) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आलीय.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दिपकराज माने यांनी आपल्या दोन्ही मुलांना दुचाकीवरून शाळेत सोडले. काही वेळानंतर, शिक्षकांनी हजेरी घेतल्यावर, स्वरूपने शिक्षकांना लघूशंकेसाठी वर्गाबाहेर जाण्याची परवानगी मागितली. वर्गाबाहेर जाताच, तो शाळेच्या गेटजवळ पोहोचला, तेव्हा अचानक नादुरूस्त असलेले लोखंडी गेट त्याच्या अंगावर कोसळले. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जोरदार रक्तस्त्राव सुरू झाला.
त्या स्थितीत, स्वरूपला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी स्वरूपला मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणअधिकारी मीना शेंडकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन, घटनेची माहिती घेतली. त्यांनी तात्काळ शाळेचे मुख्याध्यापक यांना 24 तासात या घटनेचा खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली. उद्या शुक्रवारी शाळेला सुट्टी देण्यात आली आहे. या अनपेक्षित अपघाताने माने कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.